जुगाराच्या अड्डयात झाली ज्ञानगंगा प्रवाहित!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गावातील एका उत्सवाला आलेल्या पाहुणे मंडळींनी केलेले मार्गदर्शन तेथील विद्यार्थ्यांच्या मनात घर करून गेले व विद्यार्थ्यांनी काहीतरी चांगले करून दाखविण्याचा निर्धार केला. यातूनच कधीकाळी ग्रामपंचायतच्या ज्या सभागृहात लोक जुगार खेळायचे, त्या ठिकाणी आता गावातील विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती अभ्यासिका सुरू करून सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे. हा सकारात्मक बदल भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील पागोरा या गावात पहावयास मिळतो. गावातील लोकांनी आदिवासी माना जमातीचा पारंपारिक उत्सव असलेल्या नागदिवाळी सन साजरा केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉ. बंडू चौधरी आणि आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेचे कार्याध्यक्ष नामदेव घोडमारे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी त्यांनी सण उत्सव साजरे करण्यासोबतच गावात काही रचनात्मक आणि शाश्वत काम सुरू करता येईल का? असा उपस्थित गावकºयांसमोर सवाल केला. त्यावर गावातील विद्यार्थी आणि गावकºयांनी सकारात्मक प्रतिसाद देत अभ्यासिका सुरू करण्याची इच्छा दर्शवली.

अभ्यासिका सुरू करत असताना गडचिरोली जिल्ह्यात वाल्मीक ननावरे यांनी सुरू केलेली ज्ञानगंगा अभ्यासिकेचे उदाहरण सर्वांसमोर होतेच. त्यानंतर या गावात सभेचे आयोजन करण्यात आले. या अभ्यासिकेसाठी ग्रामपंचायतीने ज्या ठिकाणी काही लोक जुगार खेळायचे ते सभागृह विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून दिले. त्यामुळे गावातील सरपंच आणि सदस्य व इतर लोकप्रतिनिधींची शिक्षणाविषयी आवड वाखाणण्याजोगी आहे. या अभ्यासिकेला गावातील पुरुषांसोबतच महिलांचेही विशेष सहकार्य आहे. या अभ्यासिकेत गावातील सर्व जाती धर्माचे ३५ विद्यार्थी अभ्यासासाठी येतात. या विद्यार्थ्यांना १२ वी शिकलेला श्रेयस आणि ११ वी शिकत असलेली साक्षीगणित शिकवते आणि त्यांचा सराव करून घेते. १२ वी शिकणारी प्राची विद्यार्थ्यांना व्यायाम शिकवते. पदवीच्या प्रथम वषार्ला असलेली सलोनी आणि नर्सिंगचे शिक्षण घेत असलेली कल्याणी इंग्रजीचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेते. ११ वी शिकत असलेली साक्षी मराठी आणि इंग्रजी शिकवते. समीक्षा गृहपाठ करून घेते. नवव्या वर्गात शिकत असलेली तेजस्विनी अंगणवाडीच्या मुलांना शिकवते.

क्रांतीज्योती अभ्यासिका ही स्वयं प्रशासनाचे उत्तम उदाहरण आहे. गावकरी या अभ्यासिकेला आर्थिक आणि इतरही मदत करत असतात. या अभ्यासिकेच्या कामावर प्रभावित झालेले मॅजिक आणि ज्ञानगंगा अभ्यासिकेचे मुख्य संयोजक वाल्मीक ननावरे, साहस उपक्रमाचे संयोजक विलास चौधरी आणि ब्राईटएजफाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत एकुडे यांनी नुकतीच अभ्यासिकेला भेट देवून ३ हजार रुपये किमतीची पुस्तके व आर्थिक मदत दिली. तसेच मार्गदर्शन करून गावकरी आणि विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. यावेळी प्रा डॉ बंडू चौधरी कार्याध्यक्ष नामदेव घोडमारे, प्रा. जांभुळकर, सुभाष शेरकुरे, अनिल चौधरी व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *