शालेय ईमारतीच्या छतावर वीज कोसळली

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : दुपारची वेळ शालेय विद्यार्थी आपापल्या वर्गात शिक्षका करवी ज्ञानार्जनाचे धडे गिरवीत होते. अचानक विजांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात होऊन शाळेच्या इमारतीवरील छताच्या कडेला वीज कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही घटना २६ जुलै रोजी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव येथे घडली. या घटनेत स्थानिक पिंपळगाव को येथील राधेय विद्यालयाच्या इमारतीचा काही भाग कोसळला. सविस्तर असे की, स्थानिक लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव को येथे राधेय विद्यालय आहे. या विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे वर्ग असून यामध्ये २५२ एवढे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ९ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, घटनेच्या दिवशी नियमित शाळा असल्याने २३० विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी शाळेत हजेरी लावली होती. दुपारच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यात शालेय इमारतीवरील छताच्या कडेला विज कोसळल्याने इमारतीचा काही भाग कोसळला. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती शाळेचे मुख्याध्यापक मुरलीधर झोडे यांनी लाखांदूर पंचायत समितीचेगटशिक्षणाधिकारी तत्त्वराज अंबादे यांच्यासह लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तहसीलदार वैभव पवार, गटशिक्षणाधिकारी तत्त्वराज अंबादे, प सं चे कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुनिल ठवरे यांनी तात्काळ शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *