प्रसुती झालेल्या महिलेचा वीस तासाच्या आत अचानक मृत्यू ?

घटनेनंतर साकोली उपजिल्हा रुग्णालयात शांततापूर्ण तणाव…
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबीय व ग्रामस्थांचा आरोप…

साकोली – उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे महिलेची प्रसुती झाल्यानंतर अचानक तब्येत बिघडल्याने वीस तासाच्या आत प्रसुती झालेल्या महिलेची मृत्यू झाली. वनिता विजय भीवगडे वय 23 वर्ष रा. मुंडीपार सडक असे मृत महिलेचे नाव आहे.

रुग्णालयात घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर संतप्त कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी रुग्णालय गाठले . संतप्तांच्या गर्दीमुळे रुग्णालय परिसरात शांततापूर्ण तणाव परिस्थिती निर्माण झाली होती. 

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याने दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे या मागणीसाठी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात बराच वेळ पीडित कुटुंबीयांसह नागरिकांनी रुग्णालय परिसराचा घेराव केला .

 

तालुक्यातील ग्राम मुंडीपार सडक येथील निवासी वनिता विजय भीवगडे वय 23 वर्षीय महिलेस 27 जूलै रोजी उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे प्रसूती करिता दाखल करण्यात आले होते 28 जुलै रोजी सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी डॉ . चारुलता गायधनी, डॉ .भास्कर गायधनी व डॉ.फैमिना अली व चमूने शस्त्रक्रिया करून  वनिताची प्रसूती केली त्यात तिला मुलगा झाला.

प्रसूती झाल्यानंतर वनिता व नवजात शिशूची प्रकृती सामान्य होती असे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सगळं काही सामान्य असताना 29 जुलै रोजी पहाटे 3.30 वाजेच्या दरम्यान वनिताची प्रकृती अचानक खालावली हे लक्षात येताच कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी  डॉ.फैमिना अली  तसेच डॉ .चारुलता गायधनी, डॉ .भास्कर गायधनी यांनी उपचार सुरू केले. मात्र उपचारादरम्यान 5.45 वाजता वनिताची प्राणज्योत मावळली.

घटनेची माहिती मिळताच खासदार सुनील मेंढे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे, माजी आमदार बाळा काशीवार,जि. प. बांधकाम सभापती मदन रामटेके जि. प. सदस्या वनिता डोये, जिल्हा शल्य चिकित्सक दीपचंद सोयाम, ठाणेदार राजेश थोरात, आमदार नाना पटोले यांचे स्वीय सहाय्यक उमेश भेंडारकर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीप मासुरकर, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश चंदवानी, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विष्णू रणदिवे, मुंडीपार सरपंच मनोरमा हुमणे, उपसरपंच हरीश लांडगे, इत्यादींनी तात्काळ रुग्णालय गाठून कुटुंबीय व ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले रुग्णालयातील  चिघळलेली परिस्थिती नियंत्रणात ठेवून मृतकच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

वनिताच्या अचानक झालेल्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी शव उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्याच्या निर्णय घेऊन फॉरेन्सिक लॅब नागपूर येथे शव पाठविण्यात आले. सदर घटनेत प्रथमदर्शनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा असल्याचे मत खासदार मेंढे यांनी व्यक्त करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

मृतक वनिता चे पती विजय भीवगडे चे आरोप
28 जुलै रोजी वनिताची प्रसुती 9 .8 वाजेच्या दरम्यान झाल्यानंतर वनिता 12 वाजता शुद्धीवर आली तिला जनरल वार्ड मध्ये शिफ्ट केल्यानंतर  तिच्या पोटात दिवसभर त्रास होत होता ही बाब कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय डॉक्टर व परिचारिकेस सांगितल्यानंतर वळीच त्या दिशेने उपचार करण्यात आले नाही.

नवजात शिशुची प्रकृती स्वस्थ व सामान्य असताना रात्री नऊ वाजेच्या दरम्यान कारण नसताना नवजात शिशुला रेफर स्लिप रुग्णालय प्रशासन कडून का देण्यात आली? माझ्या पत्नीचा मृत्यू कर्तव्यावर असलेल्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्या निष्काळजीपणा मुळे झाल्याने दोषींवर योग्य कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन मृतक चे पती विजय भिवगडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक दीपचंद सोयाम ठाणेदार राजेश थोरात यांना दिले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.