शंभर खाटाच्या रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करा – पालकमंत्री

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त भाग असलेल्या देवरी व आजुबाजूच्या नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून देवरी येथे शंभर खाटाच्या सुसज्ज रुग्णालयाचा प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार करावा, अशी सूचना पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केली. देवरी ग्रामीण रुग्णालय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले, त्यावेळी ते बोलत होते. सात कोटी सदुसष्ट लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सुसज्ज अशा देवरी ग्रामीण रुग्णालय इमारतीचे आज पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला तत्पर आरोग्य सेवा देण्यासाठी हे रुग्णालय महत्वाचे ठरणार असल्याचा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. बिरसा मुंडा ग्रामीण रस्ते विकास योजनेअंतर्गत पाच हजार कोटी रुपये निधीची तरतूद केली असून या निधीमधून ग्रामीण रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयाने स्वच्छतेचा वसा जपावा व गोरगरिबांना रुग्ण सेवा द्यावी असे ते म्हणाले. अमली पदार्थ विरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असून नागरिकांनी अमली पदार्थ सेवन करू नये व या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते.

जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, जि.प. सभापती सविता पुराम, पूजा सेठ, नगराध्यक्ष संजय उईके, उपाध्यक्ष प्रज्ञा सांगिडवार, माजी आमदार संजय पुराम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, वैद्यकीय अधीक्षक देवरी डॉ. गगन गुप्ता यावेळी उपस्थित होते. सुसज्ज अशा ग्रामीण रुग्णालयात या परिसरातील नागरिकांना शासनाच्या आरोग्याच्या सर्व योजना व सेवा मिळायला हव्यात असे खा. अशोक नेते यांनी सांगितले. रुग्ण कल्याण समितीची बैठक नियमित घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ नागरिकांना द्या असा पुनरुच्चार केला. नवनिर्मित ग्रामीण रुग्णालय इमारतीत विविध विभाग कार्यरत असणार आहेत. यात प्रामुख्याने बाहय रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, प्रयोगशाळा, क्ष-किरण विभाग, औषधी वितरण विभाग, प्रसूती विभाग, शस्त्रक्रिया विभाग, लसीकरण विभाग, नेत्र तपासणी विभाग, आयुष विभाग, क्षयरोग तपासणी विभाग, आयसीटीसी विभाग, जननी सुरक्षा विभाग, राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम, रुग्णवाहिका सेवा, सिकलसेल तपासणी व औषधोपचार, विवाह नोंदणी व शव विच्छेदन विभाग कार्यरत असणार आहे. हे रुग्णालय ३० खाटांचे आहे. या रुग्णालयात २७ मंजूर पद आहेत. आदिवासी बहुल, अतिदुर्गम व डोंगराळ, नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या देवरी तालुक्यात चोवीस तास आरोग्य सेवा पुरविण्याच्या दृष्टीने सुसज्ज ग्रामीण रुग्णालय असावे अशी या भागातील नागरिकांची मागणी होती, ती आज पूर्ण झाली आहे. नवनिर्मित रुग्णालय इमारतीचे बांधकाम तळ मजला १२३८.८० चौ.मी., पहिला मजला ७९२.१८ चौ.मी. असून अधिकारी व कर्मचारी यांची एकूण १५ निवासस्थान या ठिकाणी आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, डॉ. अमरीश मोहबे यांची समयोचित भाषणे झालीत. प्रास्ताविक डॉ. गगन गुप्ता यांनी केले. बºयाच दिवसापासून सुसज्ज रुग्णालयाची असलेली नागरिकांची मागणी पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. उत्तम रुग्ण सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी दिला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *