चोरी पकडली म्हणून वीज अभियंत्याला मारहाण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी राळेगाव : चोरी पकडून वीजपुरवठा खंडित केल्याचा राग मनात धरून महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार राळेगाव तालुक्यातील पिंपरी शिवारात बुधवार, १५ नोव्हेंबर रोजी घडला. या प्रकरणी वडकी येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता पवनगीर अनंतगीर यांनी वडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी प्रकाश नथ्थू देहारकर (वय ३०, पिंपरी) याच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. वीज अभियंता पवनगीर अनंतगीर हे वीज कर्मचारी मुकुंद जाधव यांच्यासह मजूर दशरथ उद्धव ठाकरे (रा. खैरी) व चेतन नारायण खंडाळकर (रा. बोरी गदाजी) यांना मदतनीस म्हणून घेऊन तपासणीकरिता पिंपरी शिवारात गेलेहोते. यावेळी त्यांना एका शेतामधून ६३ केव्ही रोहित्रावरून निघालेल्या लघुदाब वाहिनीवरून अंदाजे ७०० फूट लांब काळ्या रंगाची केबल अवैधरित्या टाकून वीजचोरी सुरू असल्याचे लक्षात आले.

त्यांनी त्यांच्यासोबतच्या चेतन खंडाळकरला वीजचोरीसाठी वापरलेली केबल तोडण्यास सांगितले. केबल गुंडाळत असताना त्या ठिकाणी प्रकाश देहारकरहा आला व केबल का काढली, हे माझे शेत आहे, तुमची हिंमत कशी झाली केबल तोडायची, असे बोलला. तेव्हा मी त्यास मी महावितरण कंपनीत सहायक अभियंता असून असे अवैध कनेक्शन तुम्हाला जोडता येत नाही, असे सांगितले. त्यावर प्रकाश देहारकरने अभियंता पवनगीर यांना शिवीगाळ केली. खाली पडून असलेल्या जाडजूड केबलनेच त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत सहायक अभियंत्याला मोठी दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. आरोपी प्रकाश देहारकर याच्यावर अभियंता पवनगीर यांच्या तक्रारीवरून वडकी पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून अधिक तपास ठाणेदार विजय महाले करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *