नव्या पिढीच्या कौशल्य विकासाची गरज!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : नव्या पिढीचा कौशल्य विकास साधल्यास बेराजगारी कमी होईल, उत्पादकता वाढेल,जीवनमान सुधारेल व देश आत्मनिर्भर होईल. आज चीन, जपान, अमेरिका सारखे देश कौशल्याच्या आधारे प्रगती करीत आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि स्व. दत्ताजी डिडोळकर सन्मान सोहळ्याचे राजभवनमध्ये आयोजन करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला. याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, स्व.दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह समितीचे सचिव डॉ. मुरलीधर चांदेकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन., महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दत्ताजींचे व्यक्तिमत्व प्रेरक, मार्गदर्शक होते, असे सांगितले. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली. डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी दत्ताजी डिडोळकर यांच्या कायार्चा आढावा घेतला. आशिष कुमार सिंह यांनी प्रास्ताविक केले तर दिगांबर दळवी यांनी पुस्तकाबद्दल माहिती दिली. आभार डॉ. अपूर्वा पालकर यांनी मानले.

या सोहळ्यात संपूर्ण बांबू प्रकल्पाचे सुनील देशपांडे, निरुपमा देशपांडे, भटके विमुक्त समाजासाठी काम करणारे नरसिंग झरे, द वाईज बुद्धच्या संचालिका डॉ. अर्पिता करकरे, आदिवासी मुलांना प्रशिक्षण देणारे मोहन तेलंगी, एकल विद्यालयाचे काम करणा- या बेबी संभा पोरतेट, स्वयंरोजगार क्षेत्रात काम करणारे संजयसिंग मोहारे यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दत्ताजी डिडोळकर यांच्या नावे कौशल्य विद्यापीठात अध्यासन सुरू करण्यात येणार असून त्यात महापुरुषांवर संशोधन करणा-या विद्यार्थ्यांना दरमहा २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल, अशी माहिती ना. मंगलप्रभात लोढा यांनी दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांच्या मुशीत घडलेले दत्ताजींसारखे लोक सामान्य असले तरी त्यांचे कार्य असामान्य असते. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कौशल्य विद्यापीठ व विभागाने सामाजिक क्षेत्रातील लोकांचा सन्मान केला. यापुढेही ही परंपरा अशीच सुरू राहावी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *