अंडी, केळी सोडाच पोषण आहारही बंद

 

भंडारा प्रत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- इयता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सर्वंकष आहार मिळावा, यासाठी मध्यान्ह भोजन योजना राबविली जाते. त्याचबरोबर दोन महिन्यांपासून अंडी आणि केळी देण्याचाही निर्णय घेण्यात आला. मात्र या योजनांचा बट्ट्याबोळ करण्यात येत असल्याची गंभीर बाब शहरातील कुंभारेनगर नाना चौकातील डॉ. आंबेडकर विद्यालयात सुरू आहे. मात्र शिक्षण विभागाने त्याची अद्यापही तसदी घेतली नाही. या सर्व प्रकाराकरीता मुख्याध्यापक जबाबदार आहेत. मात्र त्यांनी थेट शाळेतील महिला लिपीक आणि शाळा व्यवस्थापन मंडळाकडे बोट दाखवून अंग झटकले. शहरातील कुंभारेनगर येथे दिक्षाभूमी शिक्षण संस्था वरठी यांच्याद्वारे संचालित डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आहे. या विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे वर्ग भरतात. पाचवीत २, सहावी ३, सातवी १४ आणि आठवीत १७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत

.विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता सद्यस्थितीत पाच शिक्षक आणि एक मुख्याध्यापक आहेत. विद्यार्थी कमी आणि शिक्षकच जास्त अशी गत आहे. शाळेला पोषण आहार योजनेंतर्गत महिन्याला पोषण आहाराचे धान्य आणि त्याकरिता पैसे देखील मुख्याध्यापकाच्या खात्यात टाकण्यात येत आहेत. तर अंडी आणि केळींसाठीचे पैसे सुद्धा खात्यात येत आहेत. मात्र सिलिंडर संपला हे कारण दाखवून पोषण आहारच बंद करण्यात आला. वर्षभरापूर्वी संचालकमंडळ बदलले. परंतु, मुख्याध्यापकाने अद्यापही नवीन अध्यक्षांचे नाव बँक खात्यावर चढविले नसल्याने पैसे काढता येत नाही. या क्षुल्लक कारणामुळे मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित ठेवण्याचे काम केले आहे. मुख्याध्यापकांशी बोलले असता प्रत्येक बाबीकरीता त्यांनी महिला लिपिकाकडेबोट दाखवून आपले अंग झटकले. याप्रकरणी शिक्षण विभाग गप्प कसे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

खुलासा देण्यासही मुख्याध्यापकाची टाळाटाळ

डॉ. आंबेडकर हायस्कूल कुंभारेनगर या शाळेतील अवस्था बघून शिक्षण विभागाच्या अधिकाºयांचा संताप अनावर झाला. त्यांनी ११ त्रुट्या काढत मुख्याध्यापकाला ८ फेब्रुवारी रोजी आक्षेपांची पूर्तता करून स्वयंस्पष्ट खुलासा सादर करण्याचे पत्र दिले. मात्र महिना लोटत असताना अद्यापही मुख्याध्यापकाने खुलासा दिला नाही. त्यामुळे शाळा आणि शिक्षण विभागात नेमके चालले काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

अहवालात त्रुट्यांची सरबत्ती

पी.एम. पोषण शक्ती निर्माण योजनेचा आढावा घेण्यासाठी ५ फेब्रुवारी रोजी गटशिक्षणाधिकारी यांच्या पथकाने शाळेला भेट दिली. त्यावेळी शाळेत केवळ नकारात्मकताच आढळून आली. त्यांनी दिलेल्या अहवालात भेटीच्यावेळी मुख्याध्यापक उपस्थित नव्हते. विद्यार्थी उपस्थिती नोंदवही नाही. दर्शनी भागात मेनू प्रदर्शन नाही. आपात्कालीन यंत्रणाचे संपर्क क्रमांक नाही. स्वयंपाकी किंवा मदतनिसांचा करारनामा केला नसून त्यांची वैद्यकीय तपासणीला केलेली नाही. आहार नमूना काढण्यात येत नाही. पोषण आहार कॅशबूल अद्ययावत नाही. २०२३-२४ या सत्रात प्राप्त अनुदान आहारीत केले नाही.अंडी, केळीचे अनुदान मुख्याध्यापकाच्या खात्यावर टाकूनही त्यांचे वाटप न करता त्यापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवले. शाळा परीसरात स्वच्छतेचा अभाव आहे. प्रशासकीयदृष्ट्या परसरतेचा अभाव असल्याच्या त्रुट्या नोंदविण्यात आल्या.

“पोषण आहाराचे पैसे संस्थाध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांच्या संयुक्त खात्यावर जमा झाले. मात्र वर्षभरापूर्वी संचालकमंडळ बदलले. नवीन संस्थाध्यक्षांचे नाव अद्याप बदलले नाही. त्यामुळे पैसे काढता आले नाही. अद्यापही केळी आणि अंडी विद्यार्थ्यांना दिलेल्या नाही. तसेच पोषण आहार देखील बंद आहे. खातेबदल झाल्यानंतरच आहार वाटप सुरू होईल.”

व्ही. एस. सोरते, मुख्याध्यापक

…तर कारवाई निश्चित

डॉ. आंबेडकर विद्यालयातील कारभाराची तक्रार आली. चौकशी करून तसा खुलासा देणारे पत्र मुख्याध्यापकाला दिले. मात्र त्यांनी अद्याप खुलासा सादर केलेला नाही. विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित आहेत. याप्रकरणी नक्कीच कारवाई करण्यात येईल.

जनार्दन राऊत, गटशिक्षणाधिकारी

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *