मॉयलच्या १८ कामगारांना तडकाफडकी कामावरून काढले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नाकाडोंगरी : मॉयल लिमिटेडच्या डोंगरी बुजुर्ग मँगनीज खाणीत गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावणाºया १८ स्थानिक कामगारांना नवीन कंत्राटदाराने कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता कामावरून कमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ७ डिसेंबरपासून हे कामगार बेरोजगार झाले असून, व्यवस्थापनाच्या या भूमिकेमुळे कामगार कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. डोंगरी बुजुर्ग खाणीत ‘मेसर्स मधुकरराव सांभारे यांच्याकडे २९९ मंजूर पदांच्या तुलनेत ३२८ कर्मचारी कार्यरत होते. मात्र, ७ डिसेंबर २०२५ पासून या कामाचे नवीन कंत्राट ‘बडे बाबा मायनिंग अँड कन्सल्टन्सी छछढ’ ला देण्यात आले. कंत्राट बदलताना जुन्या सर्व कर्मचाºयांना सामावून घेणेअपेक्षित असताना, व्यवस्थापनाने १८ कर्मचाºयांना अचानक कामावरून कमी केले.

कायद्याचे उल्लंघन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष

पिडीत कामगारांच्या म्हणण्यानुसार, त्यांना कामावरून काढण्यापूर्वी ‘इंडस्ट्रियल डिस्प्युट्स अ‍ॅक्ट, १९४७’ च्या कलम २५-एफ अंतर्गत कोणतीही लेखी नोटीस किंवा भरपाई देण्यातआलेली नाही. या संदर्भात कामगारांनी मॉईल मॅनेजर आणि ग्रुप एजंट यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला, परंतु अद्याप कोणतीही सकारात्मक कार्यवाही झालेली नाही. याउलट, बायोमेट्रिक्स हजेरी आणि अधिकृत ‘आॅथोरायझेशन लेटर’ असतानाही कर्मचाºयांना गेटच्या बाहेर ठेवले जात आहे.

कुटुंबांची दयनीय अवस्था

कमी करण्यात आलेल्या १८ कामगारांमध्ये अनेकांच्या पत्नी गर्भवती आहेत, तर काहींच्या पत्नींची नुकतीच प्रसूती झाली आहे. वृद्ध आईवडिलांच्या औषधोपचाराचा आणि संसाराचा खर्च कसा चालवायचा, असा गंभीर प्रश्न या तरुणांसमोर उभा ठाकला आहे. या अन्यायामुळे कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून त्यांच्यावर मानसिक दडपण येत आहे.

आंदोलनाचा इशारा

कामगारांनी मॉयलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना (नागपूर) निवेदन पाठवून दोन दिवसांत कामावर घेण्याची किंवा लेखी कारण देण्याची मागणी केली आहे. जर दोन दिवसांत निर्णय झाला नाही, तर कामगार आयुक्त कार्यालय, जिल्हा प्रशासन आणि न्यायालयात धाव घेण्याचा इशारा या कर्मचाºयांनी दिला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *