जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास

रवी धोतरे /भंडारा पत्रिका लाखनी:- लाखनी शहरात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांच्या मागणीवरून उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात आले मात्र बांधकाम केलेल्या उड्डाणपुलावर वारंवार दुरुस्तीचे काम होत असल्याने वाहतूक उड्डाण पुलाच्या खालून वळविण्यात येत असल्याने शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली असून वृद्ध, जेष्ठ नागरिक महिला यांना पायदळ फिरणे कठीण झाले आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी बांधकाम करणाºया कंपनीने सुरक्षारक्षक ठेवले असले तरीही ते पूर्णवेळ उपस्थित राहत नाही. तसेच नियुक्त केलेले वाहतूक पोलीसही वसुलीच्या नादात दररोज पिंपळगाव/सडक, केसलवाडा फाटा या परिसरात राहत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. त्यामुळे नागरिक धोक्यात अन पोलीस वसुलीत अशी अवस्था असल्याने अनेकांचा जीव धोक्यात आला आहे.

लाखनी हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून शैक्षणिक व्यावसायिक व शासकीय महत्त्वाचे केंद्र आहे लाखनी शहरात आजूबाजूच्या गावातील व परिसरातील हजारो विद्यार्थी नागरिक आपल्या शिक्षणासाठी व दैनंदिन कामासाठी लाखनी येथे दाखल होत असतात शहरात शासकीय कार्यालय व बँका यांना पार्किंग सुविधा नसल्यामुळे सर्विस रोडवरच नागरिक आपली वाहने पार्किंग करीत असतात तसेच सर्विस रोडच्या सुरुवातीपासूनच अतिक्रमण असल्यामुळे नागरिकांना सर्विस रोड वरून पायी चालणे ही कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना महामागार्चा अवलंब करावा लागत असतो शहरात अनेक अपघात होऊन काहींना आपला जीव गमवावा लागला तर काहींना कायमचे दिव्यांगत्व आले.

मात्र प्रशासन नागरिकांच्या हितासाठी कोणतेही पावले उचलताना दिसून येत नाही. तसेच येथील वाहतूक पोलीस कर्मचारी रविवारी सकाळी मात्र केसलवाडा फाट्यावर परिसरात भंडारा कडे जाणाºया काळ्या जनावरांच्या वाहतुकीकडे लक्ष देण्यासाठी थंडीतही वसुलीच्या नादात आपले कर्तव्य बजावत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक व स्थानिक पोलीस निरीक्षकांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. वाहतुक उड्डाण पुलाच्या खाली असलेल्या रोडने व सर्विस रोडने सुरू असल्याने सर्व सामान्य जनतेला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर गतिरोधक लावण्यात आले असले तरीही काही गतिरोधक तुटल्याने वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *