
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : शहरातील शिवाजी महा- राज टी-पॉईंट येथे १७ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात सेवानिवृत्त शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली होती. अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या अज्ञात पिकअप वाहनाचा लाखांदूर पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत थेट तेलंगणा राज्यात जाऊन छडा लावला आहे.
सदर ताब्यात घेतलेल्या चालकाचे नाव कमलाकर जागोजी धंद्रे (वय ३०), रा. व्यंकटरावपेट, जिल्हा तेलंगणा असे आहे. तर या अपघातात मृत्यू पावलेल्या शिक्षकाचे नाव महादेव मेश्राम (वय ६२) असे असून ते शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य होते. प्राप्त माहितीनुसार, एम. के. मेश्राम हे आपल्या मालकीच्या दुचाकीने रस्ता ओलांडत असताना वडसा दिशेकडून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात पिकअप वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की मेश्राम सर थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडर जवळील लोखंडी कठ- ड्यावर आदळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला व मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी तत्काळ मेश्राम यांना लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांना मृत घोषित केले. ही बातमी समजताच रुग्णालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची गंभीर दखल घेत लाखांदूर पोलिसांनी अज्ञात पिकअप वाहनाविरोधात गुन्हा नोंद करून तपासाचे चक्र वेगाने फिरवले. सीसीटीव्ही फुटेज, वाहनांच्या हालचाली, तांत्रिक माहिती आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास करताना सदर पिकअप वाहन पोल्ट्री व्यवसायाशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले.
या तपासादरम्यान लाखांदूर पोलिसांचे पथक थेट तेलंगणा राज्यात पोहोचले, जिथे संबंधित पिकअप वाहन हस्तगत करून चालकास ताब्यात घेण्यात आले. हा संपूर्ण तपास लाखांदूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस हवालदार संतोष चव्हाण आणि सपाटे पोलीस यांच्या अथक परिश्रमातून यशस्वी झाला आहे. अल्पावधीत आंतरराज्य तपास करून आरोपीला अटक केल्याबद्दल नागरिकांकडून लाखांदूर पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.