
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्याच्या दुतर्फा बेकायदेशीरपणे उभारलेली दुकाने, हातठेले, फळविक्रेते, तसेच मनमानी वाहन पार्किंग यामुळे वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून, वाहनचालकांसह पादचाºयांनाही प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नगरपरिषद व वाहतुक नियंत्रण शाखेकडून सम-विषम पार्किंगचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, अंमलबजावणीच्या अभावामुळे हे नियोजन पूर्णत: निष्प्रभ ठरले आहे. प्रत्यक्षात बाजारपेठेत कुठेही शिस्तबद्ध पार्किंग दिसून येत नाही. नियम धाब्यावर बसवून वाहनधारक मनमानीपणे रस्त्यावरच वाहने उभी करत असल्याने, अरुंद रस्त्यांवरून वाहनांची कोंडी नित्याची झाली आहे.
बाजारात पायी चालणे देखील आता धोक्याचे बनले आहे. अतिक्रमणामुळे फुटपाथ पूर्णपणे व्यापले गेले असून नागरिकांना थेट रस्त्यावरूनच चालावे लागत आहे. परिणामी अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषत: महिला, वृद्ध, विद्यार्थी आणि लहान मुलांना जीव मुठीत घेऊन बाजारात वावरावे लागत आहे. संपूर्ण परिस्थितीकडे पाहता, नगरपरिषदेचे दुर्लक्षच या अराजकतेस कारणीभूत ठरत असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे. अतिक्रमण हटविण्याबाबत केवळ कागदी कारवाई आणि दिखाऊ मोहिमा राबविल्या जात असून, प्रत्यक्षात ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना होताना दिसत नाहीत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अतिक्रमण तातडीने हटवून, समविषम पार्किंगची काटेकोर अंमलबजावणी, स्वतंत्र पार्किंग झोनची निर्मिती, तसेच वाहतूक पोलिसांची नियमित गस्त सुरू करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.