झरीच्या शिवालयात ‘हर हर महादेवा’चा जयघोष

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या आणि हिरव्यागार वनराईने नटलेल्या लाखांदूर तालुक्यातील झरी तलाव परिसरातील महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. निसर्गसौंदयार्चा वरदहस्त लाभलेल्या या तीर्थक्षेत्रावर आज शिवभक्तांचा अलोट जनसागर लोटला असून, भक्तिभावा सोबतच झरी तलावाच्या विकासाची आणि सिंचनाची आर्त हाकही या निमित्ताने घुमली. झरी तलाव परिसर म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच. चहुबाजूने पसरलेली झाडे आणि शांत जलसाठा यामुळे या परिसराला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर या निसर्गरम्य ठिकाणी महादेवाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या. उत्सवाच्या भक्तीमय वातावरणात झरी उपसा सिंचन व पर्यटन स्थळ मंजूर व्हावे, या मागणीसाठी लावलेले फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

शेतकरी नेते बालुभाऊ चुन्ने यांच्या नेतृत्वात गेल्या सहा वर्षांपासून हा लढा सुरू आहे. शासनाला झोपेतून जागे करण्यासाठी आणि स्थानिक शेतकºयांच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी त्यांनी महाशिवरात्रीचा हा मंच प्रभावीपणे वापरला आहे. यावेळी चुन्ने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले “केवळ उत्सव साजरा करणे हा उद्देश नसून, झरीतलावाचे रूपांतर एका समृद्ध पर्यटन स्थळात व्हावे आणि उपसा सिंचन योजनेद्वारे शेतकºयांच्या शेतात पाणी पोहोचावे, हीच खरी महादेवाची सेवा ठरेल,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

शिवालयात आज दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक अ‍ॅड. मोहन राऊत (सपत्नीक) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सुहास शेंडे, ललित दाणे, किशोर मंडाले, दिनेश गोंडाने यांच्यासह असंख्य शिवभक्त उपस्थित होते. तुमसर येथील कलाकारांनी सादर केलेल्या संगीतमय कार्यक्रमाने भक्तांना मंत्रमुग्ध केले. मंदिर समितीच्या वतीने महाप्रसाद आणि साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संजना वरखेडे, जितेंद्र बोंद्रे, राकेश राऊत, महेश ब्राह्मणकर, अंकित पगाडे, संजय झोंडे, राजू मेश्राम, उदाराम कन्नाके, सारंग बिरे, संजय नहाले, सुभाष दिवठे, रजत देव्हारे, दुधराम नागोसे, राहुल हर्षे, रवींद्र झोडे यांच्यासह असंख्य शिवभक्तांनी अहोरात्र परिश्रम घेतले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *