
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदुर : आजच्या काळात पुस्तकी ज्ञानासोबतच व्यवहारिक शिक्षण किती महत्त्वाच्या यांचे उत्तम उदाहरण लाखांदूर तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेने घालून दिले आहेत . खैरी (घर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या परसबागेत पिकवलेला भाजीपाला थेट आठवडी बाजारात विकून हजारो रुपयांची कमाई केली आहे. शाळेतील पोषण आहार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या परिसरातच परसबाग फुलवली होती . या बागेतून पोषण आहारासाठी आवश्यक भाजीपाला वापरल्यानंतर उर्वरित मोठ्या प्रमाणात उपलब्ध वांगे, टमाटर ,कोबी आणि मुळा यासारख्या भाज्याची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील आठवडी बाजारात या बाल विद्यार्थ्यांनी आपल्या भाज्याची छोटीशी दुकान थाटली. गणवेशात बसलेल्या या चिमुकल्या विक्रेत्याकडे पाहून ग्राहकामध्येही प्रचंड कुतूहल निर्माण झाले होते . ‘केमिकल मुक्त ’आणि ‘ताज्या’ भाज्या असल्याने ग्राहकांनीही त्यांना भरघोस प्रतिसाद दिला.या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ भाजी विकली नाही तर हिशोब करण्याची कला आत्मसात केली. यातून विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी संवाद साधण्याचे कौशल्य शिकले . कष्टाचेमहत्त्व आणि उद्योजकतेची पहिली पायरी अनुभवली . दिवसाभराच्या या विक्रीतून विद्यार्थ्यांनी हजारो रुपयांचा नफा मिळविला . हा निधी शाळेच्या विकास कामासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमासाठी वापरण्यात येणार असल्याचे समजते. या नोकिया उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून ‘ शिकणारा शेतकरी आणि स्वावलंबी विद्यार्थी ’ अशी नवी ओळख या मुलांनी निर्माण केली आहे .