होळीनिमित्त ‘शिंगोट्या’ बनविण्याची परंपरा हद्दपार

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : वसंत ऋतूच्या स्वागतासाठी साजरा होणारा होळी व रंगपंचमी हा सण मोहाडी तालुक्यातील खेडोपाडी तसेच शहरांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दुसरे दिवशी धुलिवंदन. या दिवसांपासून गावोगावी मांडावर शिमगा खेळला जातो. घुमटाच्या तालावर पारंपारिक पद्धतीने रचलेले काव्य म्हणजे फाग गायले जातात. दोन पुरूष पात्र स्त्री वेषात पुढे नाचत असतात. मध्ये मध्ये सोंग घेऊन येतात. समाजातील अनिष्ट रूढी परंपरा यांच्यावर टीका टिप्पणी केली जाते. उद्देश एकच असतो तो म्हणजे वाईट विचार विषय यांपासून समाजाचे उद्बोधन करणे. फागांमध्ये सुद्धा स्थानिक देवदेवता ऐतिहासिक, पौराणिक विषय प्रामुख्याने येतात. संपूर्ण रामायण गायले जाते. झाडांच महत्व काय आहे ते वर्णिले जाते. सीता शोधासाठी लंकेत आलेल्या हनुमंताला भूक लागते. तो अशोक वाटिकेतील फळे खाण्याविषयी सीतेकडे आज्ञा मागतो. तेव्हा सीता हनुमंताला काव्यात सांगते. पडले झडलेली फळे खा तोडू नको वृक्षवाटीका तोडून मोडून टाकायची हनुमंताला सवय होती.

एकीकडे शिमगा चालू असताना देवखेळे मंदिरामधून बाहेर पडतात. मोठमोठ्या गांवाच्या मोठमोठ्या मंदिरांतून. सजूनधजून वेगवेगळ्या वेशात निशाणे खांद्यावर घेऊन देवखेळे वाजत-गाजत गुलाल उधळत सोबत देव घेऊन बाहेर पडतात. आपापल्या गांवाच्या हद्दीतील घरोघरी हे देवखेळे वाजत-गाजत निशाण आणि देव घेऊन जातात. सर्व रस्ते सर्व पायवाटा भगवामय होऊन जातात. सर्व घरे देवमय होतात. पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी दिंडी घेऊन जातात. इथे देवखेळ्याच्या रूपात पांडुरंग भक्तांना भेटायला घरोघरी जातो. हिच तर खरीखुरी भक्तीची ओढ आहे. हिच तर माणसांची श्रीमंती आहे. या सणानिमित्त मोहाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी व त्यांचा परिवार काही परंपरा आजही पाडत आहे. याच परंपरा पैकी एक परंपरा म्हणजे शिंगोट्या तयार करण्याची परंपरा यांना काही भागात चाकोल्या म्हणतात. लहान मुले यांना कावळा, चिमणी, वळा, सुपारी या व्यंगात्मक नावाने संबोधतात. आधीच्या काळी होळीचा सण जवळ आला की ग्रामीण भागातील मुलांची लगबग शेण गोळा करायची असे.

सायंकाळी गोधन घरी परत असताना उठलेल्या धुळीच्या आत घुसून मूले पडलेले शेणाचे पौटे टोपली मध्ये गोळा करायचे. दुसºया दिवशी शेजारच्या गोठ्यात धाव घेऊन सकाळीच शेण गोळा करून अगोदरच्या दिवसाच्या शेणात मिसळून घ्यायचे. सोबतच चुलीतली राख गोळा करून थोडी थोडी शेणात घालायची आणि हाताच्या वेगवेगळ्या आकाराचे साचे करून त्यात शेण घालायचे. हाताला शेण लागू नये म्हणून चुलीतली राख हाताला भस्मासारखी फासायची. त्रिकोणाकार, वतुर्ळाकार आयताकार असे सर्व भौमितिक आकार तयार करायचे. हे सर्व झाले की,नारळ बनवायची मजा वेगळीच असे. नंतर हे सर्व आकार उन्हात आठ ते दहा दिवस वळत ठेवले जायचे. होळीच्या रात्री चौकात सार्वजनिकरित्या होळी पेटवली जायची. आजही ही परंपरा काही अंशी खेडोपाडी पहावयास मिळते. गावातील सर्व मान्यवर तेही उपस्थित असतात. सर्व जण आपापल्या घरची शिंगोट्यांची माळ होळीतील पेटत्या आगेत घालून स्वत:च्या सुखी व निरोगी आयुष्याची कामना करतात. मातीतून मोबाईलकडे वळलेली आजची पिढी. आजच्या मुलांना चाकोल्या म्हणजे काय हेच कळत नाही. मातीपासून दूर झालेले आजचे बालपण मोबाईल मध्ये हरवलेले पहावयास मिळते. घरात बसून जग फिरणाºया मुलांना हे अंगणात बसून शेणा-मातीत खेळणे आवडेल का? अशी परस्थिती सद्या पहावयास मिळते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *