
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : विदर्भातील तांदळाची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाºया तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल कामगारांच्या इतिहासात एक नवी पहाट उजाडली आहे. वषार्नुवर्षे कष्ट करूनही दुर्लक्षित राहिलेल्या हमाल कामगारांनी अखेर अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) च्या लालबावट्याखाली संघटित होण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने बाजार समिती परिसरात पहिल्यांदाच आयटकचा लालबावटा फडकला असून कामगारांनी आपल्या हक्कांसाठी एल्गार पुकारला आहे. ३५ सदस्यीय समितीची स्थापना बाजार समितीतील हमाल कामगारांच्या प्रश्नांकडे प्रशासन आणि व्यापारी वर्गाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ ही संघटनात्मक बांधणी करण्यात आली.
आयोजितबैठकीत २०० हून अधिक हमाल कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी ३५ सदस्यीय हमाल युनियन समिती स्थापन करण्यात आली असून, समितीच्या समन्वयक पदी कॉम्रेड वैभव चोपकर यांची सवार्नुमते निवड करण्यात आली. कामगारांनी सभासद नोंदणी शुल्क भरून मोठ्या उत्साहात संघटनेचे सभासदत्व स्वीकारले. अन्यायाविरोधात संघटित शक्तीचा निर्धार हमाल कामगारांना रात्रंदिवस कष्ट करूनही योग्य वेतन, सामाजिक सुरक्षा आणि कामाच्या ठिकाणी मूलभूत सुविधा मिळत नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. या अन्यायाविरोधात आता संघटित शक्तीच्या जोरावर लढा उभारला जाईल, असा निर्धार कामगारांनी व्यक्त केला. हक्काचे वेतन आणि सन्मान मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही असा पवित्रा नवनिर्वाचित समितीने घेतला आहे. याप्रसंगी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मोहाडी तालुका सचिव कॉम्रेड अनिल गाढवे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी हमाल कामगारांना मार्गदर्शन करताना सांगितले की, संघटित कामगार शक्तीसमोर कोणतीही अन्यायी व्यवस्था टिकू शकत नाही. आयटकच्या माध्यमातून आपण आपल्या मागण्या पदरात पाडून घेऊ. या बैठकीमुळे तुमसर बाजार समितीमधील हमाल कामगारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात कामगार हिताचे विविध विषय प्रशासनासमोर मांडले जाणार आहेत.