
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धमार्दाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून मागील तीन महिन्यांत जिल्ह्यातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कालावधीत एकूण १८ लाभार्थ्यांना १५ लाख २० हजार रुपये इतकी आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. राज्यातील गरजू रुग्णांना गंभीर आजारांच्या उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यरत आहे. नैसर्गिक आपत्ती, मोठे अपघात तसेच विविध गंभीर आजारांवरील उपचारांसाठी या निधीतून तातडीने आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच राज्यातील नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये उपचार घेणाºया आणि इतर शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळू न शकणाºया गरीब रुग्णांनाही या योजनेचा लाभ दिला जातो.
या योजनेअंतर्गत कर्करोग, हृदयरोग, अवयव प्रत्यारोपण, अस्थिमज्जा प्रत्यारोपण, डायलिसिस, मेंदूचे आजार, जळीत रुग्ण तसेच इतर गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. पूर्वी या निधीसाठी अर्ज करण्यासाठी नागरिकांना थेट मुंबई येथील मंत्रालयात जावे लागत होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वेळ आणि खर्चाचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही अडचण दूर करण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धमार्दाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने १ मे २०२५ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यरत करण्यात आला आहे.
या कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व उपचारांसाठी आर्थिक मदतीबाबत मार्गदर्शन केले जाते. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी रुग्णांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १.६० लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे. अजार्सोबत विहित नमुन्यातील अर्ज, आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक तसेच संबंधित आजाराची वैद्यकीय कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते. जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. मनीष बत्रा, वैद्यकीय अधिकारी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धमार्दाय रुग्णालय मदत कक्ष, भंडारा यांनी केले आहे.