
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : सुरेवाडा गावाजवळ वैनगंगा नदीच्या काठावर उभारण्यात येत असलेल्या सुरेवाडा उपसा सिंचन योजनेच्या कामाला वनक्षेत्रातील झाडांचा अडथळा निर्माण झाला. यामुळे प्रकल्पाचे अंतिम काम प्रलंबित राहिले असून योजनेच्या लाभापासून २८ गावांतील सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्र वंचित राहण्याची शक्यता आहे. सुरेवाडा उपसा सिंचन योजना ही भंडारा तालुक्यातील शेतीसाठी महत्त्वाची मानली जात असून या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतीला पाणीपुरवठा होणार आहे. याप्रकल्पासाठी आवश्यक असलेली ३७.५१२ हेक्टर वनजमीन पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालय यांच्या आदेशानुसार जलसंपदाविभागाकडे वर्ग करण्यात आलेली आहे.
या वनक्षेत्रातील झाडे तोडण्यासाठी संबंधित विभागाकडून मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आवश्यक असलेली रक्कमही संबंधित विभागाकडे जमा करण्यात आली आहे. वनविभागाचे उपवनसंरक्षक यांनी यासंदर्भात गोसीखुर्द उपसा सिंचन विभाग, आंबाडी येथील कार्यकारी अभियंत्यांना पत्राद्वारे झाडे तोडण्यासाठी फरकाची रक्कम भरण्याबाबत कळविले होते. त्यानुसार रक्कम जमा करण्यात आल्यानंतर सुरेवाडा उपसा सिंचन क्षेत्रातील काही भागातील झाडे तोडण्यात आली. त्या ठिकाणचे काम पूर्ण करण्यात आले असल्याचेही सांगितले जाते. सद्यस्थितीत या योजनेअंतर्गत पंपगृहाचे काम तसेच उर्ध्वनलिकेचे एकूण ८.१० किमीपैकी सुमारे ७.४५ किमीपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. तसेच मुख्य कालव्याचे सुमारे १० किमीपर्यंतचे कामही पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे. मात्र, वन्यजीव क्षेत्रातील ६५० मीटर लांबीच्या उर्ध्वनलिकेचे काम झाडांची कटाई न झाल्यामुळे प्रलंबित आहे, अशी चिंता या भागातील कास्तकारांकडून व्यक्त केली जात आहे.