साकोली तालुक्यात नरभक्षक वाघिणीची दहशत कायम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : बामपेवाडा, उमरझरी व आमगाव खुर्द परिसरात नरभक्षक वाघिणीच्या सलग हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण तीव्र झाले आहे. गेल्या १५ दिवसांत दोन जणांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी अवस्थेत नागपूर येथे उपचार घेत आहे. या घटनांमुळे ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन पूर्णत: विस्कळीत झाले असून शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत, तर महिला, जेष्ठ नागरिक व शाळकरी मुले यांचे घराबाहेर पडणेही धोकादायक बनले आहे. उन्हाळ्यात पिकांना पाणी देणे आवश्यक असतानाही भीतीमुळे शेतीकडे दुर्लक्ष होत असून उदरनिवार्हाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभागाकडून ड्रोन कॅमेरे, पिंजरे, शार्पशूटर व सुमारे १०० अधिकारी-कर्मचाºयांचा ताफा तैनात करून युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे.

मात्र तज्ञांच्या मते, हल्ल्यानंतर वाघ त्या ठिकाणी परत येत नसल्याने त्याला ट्रेस करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रयत्न सुरू असूनही अद्याप वाघिणीला जेरबंद करण्यात यश आलेले नाही. संजय मेंढे (सहाय्यक वनसंरक्षक, साकोली) यांनी सांगितले की, वनविभागाकडून सतत जनजागृती केली जात असून नागरिकांनी गटाने फिरणे, आवाज करणे, रात्री बाहेर जाणे टाळणे यांसारख्या सूचनांचे पालन करावे. वाघिणीला पकडण्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न सुरू असून रात्रंदिवस अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभाग कटिबद्ध असून मचान, ड्रोन, पिंजरे व विशेष पथकाच्या मदतीने वाघिणीला लवकरच पकडले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नेपाल रंगारी (माजी जि.प. सदस्य) यांनी वनविभागावर नाराजी व्यक्त करत तातडीने कारवाईची मागणी केली. माया सोनवणे यांना वेळेवर योग्य उपचार मिळाले असते, तर त्यांचा जीव वाचला असता, असा आरोप त्यांनी केला. शेती व उपजीविकेवर मोठा परिणाम होत असून दोन दिवसांत वाघिणीला पकडले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

माहेश्वरी नेवारे (जिल्हाध्यक्ष, भाजपा महिला मोर्चा) यांनी मृत व जखमी कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली. गावांमध्ये प्रकाशयोजना, शेतांना कुंपण व संरक्षण उपाययोजना राबवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. नंदेशिनी मेश्राम (सरपंच, बामपेवाडा) यांनी दुहेरी संकटाची जाणीव करून देत सांगितले की, वाघाच्या दहशतीसोबतच गॅस सिलेंडर टंचाईमुळे सरपण आणण्यासाठी जंगलात जाणेही धोकादायक झाले आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली असून तातडीने वाघाला पकडून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, खासदार प्रशांत पडोळे यांनी उमरझरी येथे स्व. माया सोनवणे व बामपेवाडा येथे स्व. वसंता मेश्राम यांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी सभापती ललित हेमने, जि.प. सदस्य नेपाल रंगारी, कैलाश भगत, योगेश मानकर, जितू रहाटे, गजानन मेश्राम, रसिकताई मेश्राम यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. खासदारांनी पीडित कुटुंबांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाला मागणी केली आहे की तातडीने वाघिणीला जेरबंद करावे व नागरिकांचे जीव सुरक्षित करुन व परिसरातील जीवनमान सुरळीत करावे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *