विदर्भासह मध्य भारत चाळीशीपार,आठ राज्यांमध्ये उष्णतेचा इशारा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : देशभरात एप्रिल महिन्याच्या मध्यापासूनच उष्णतेची तीव्रता वाढू लागली असून अनेक भागांमध्ये उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. राजधानी दिल्लीसह उत्तर भारत, पश्चिम भाग आणि मध्य भारतात तापमान झपाट्याने वाढत असल्याने उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत उष्णतेसोबत दमटपणाही वाढणार असल्याने नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागू शकतो. दिल्लीत सतराव्या एप्रिलपर्यंत तापमान एकेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वायव्य भारतात तापमानात चार ते सहा अंशांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगड या भागांमध्येही तापमानात तीन ते पाच अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातही उष्णतेची तीव्रता हळूहळूवाढत असून तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होऊ शकते. ओडिशा, गुजरात आणि किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशात पुढील आठवडाभर उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याच काळात पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्येही अशीच परिस्थिती राहणार असल्याचे संकेत आहेत. मध्य प्रदेशात सोळाव्या एप्रिलपर्यंत तापमानात तीन ते पाच अंशांनी वाढ होण्याचा अंदाज असून विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये सतराव्या एप्रिलपर्यंत दोन ते चार अंशांनी वाढ होऊ शकते.

महाराष्ट्रातही सतराव्या एप्रिलपर्यंत तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, झारखंड, गुजरात,आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मराठवाडा तसेच सौराष्ट्र आणि कच्छ या भागांसाठी चौदावा ते सोळावा एप्रिलदरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अलीकडेच पूर्व मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, आग्नेय उत्तर प्रदेश, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल तसेच हरियाणा आणि कच्छ या भागांमध्ये तापमानात दोन ते चार अंशांनी वाढ नोंदवण्यात आली. देशातील सर्वाधिक तापमान महाराष्ट्रातील अकोला येथे त्रेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे.याच वेळी ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाºयासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता असल्याने हवामानात मोठा बदल जाणवण्याची शक्यता आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *