८ मे रोजी आझाद मैदानावर मुंडण आंदोलन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : मागील २० ते २५ वर्षांपासून शासन सेवेत कायम होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या समग्र शिक्षा अभियानातील हजारो कर्मचाºयांचे मुंबईतील आझाद मैदानावरील बेमुदत आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. तब्बल ५७ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे संपूर्ण शिक्षण विभागाचे लक्ष लागले असून, सरकारकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाºयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या आंदोलनात सहभागी असलेल्या महिला कर्मचाºयांनी आता कठोर भूमिका घेत, दि. ८ मे रोजी आझाद मैदानावर सामूहिक मुंडण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

‘आमच्या सेवेला न्याय न मिळाल्यास हा आमचा अंतिम मार्ग असेल,’ असा इशारा त्यांनी दिला आहे. सन २००१ पासून सुरू असलेल्या समग्र शिक्षा अभियानात विषयसाधन व्यक्ती, डेटा एंट्री आॅपरेटर, लेखा,एमआयएस कोआॅर्डिनेटर, अभियंता, जिल्हा समन्वयक, सहायक कार्यक्रम अधिकारी अशा विविध पदांवर कर्मचाºयांची तात्पुरत्या करारावर नियुक्ती करण्यात आली. मात्र, गेली दोन दशके सेवा बजावूनही त्यांना कायमस्वरूपी दर्जा मिळालेला नाही. या दीर्घ काळात २५७ कर्मचाºयांचा सेवेदरम्यान मृत्यू झाला असून, अनेकांनी निवृत्तीही अनुभवली आहे. तरीही ‘सकारात्मक निर्णय’ या आश्वासनावरच कर्मचारी आजपर्यंत थांबले आहेत. आंदोलनादरम्यान कर्मचाºयांनी रक्ताने पत्र लिहिणे, रस्ता रोको, झाडावर चढाई, थाळीनाद, पुरुषांचे मुंडण अशा विविध मार्गांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

अनेक खासदार-आमदारांनी भेट दिली असली तरी मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याने भेट न दिल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली. विरोधी पक्षात असताना अनेक नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत सत्तेत आल्यानंतर कर्मचाºयांना कायम करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजही तो निर्णय प्रलंबितच आहे. आता ‘लाडके भाऊ-बहिण’ म्हणून किमान उर्वरित ३३७८ कर्मचाºयांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली आहे. महिला कर्मचाºयांच्या मुंडण आंदोलनाच्या इशाºयामुळे या प्रश्नाची तीव्रता अधिक वाढली असून, येत्या काही दिवसांत सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *