
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी आमगाव : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाºया लाभार्थ्यांसाठी आमगाव नगर परिषद प्रशासनाने महत्त्वपूर्ण सूचना जारी केली आहे. केंद्र शासनाच्या पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने निधी वितरणाची प्रक्रिया सध्या तात्पुरती थांबली असून, कोणत्याही लाभार्थ्याचा निधी रद्द झालेला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा, असे आवाहन मुख्याधिकारी प्रमोद कांबळे यांनी केले आहे. नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनुदान वितरणासाठी वापरण्यात येणाºया पोर्टलची देखभाल आणि तांत्रिक दुरुस्तीचे काम केंद्र शासन स्तरावर सुरू आहे. पोर्टल तात्पुरते बंद असल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी जमा होण्यास विलंब होत आहे. ही केवळ तांत्रिक समस्या असून ती लवकरच दूर होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुख्याधिकारी प्रमोद कांबळे यांनी सांगितले की, पात्र लाभार्थ्यांच्या देयकांबाबत आवश्यक सर्व प्रशासकीय आणि आर्थिक प्रक्रिया नगर परिषद स्तरावर पूर्ण करण्यात आली आहे. केंद्र शासनाचे पोर्टल पुन्हा कार्यान्वित होताच लाभार्थ्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम तत्काळ जमा करण्यात येईल. दरम्यान, काही समाजकंटकांकडून योजनेचा निधी परत गेला, अनुदान बंद झाले किंवा घरकुल योजना बंद पडली अशा स्वरूपाच्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाºया अफवा पसरवल्या जात असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा बिनबुडाच्या माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिकृत माहितीसाठी लाभार्थ्यांनी थेट नगर परिषद प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. जनतेने घरकुल योजना व इतर शासकीय योजणांच्या अडचणी भासल्यास अधिकृत माहिती घेऊन कार्य करण्याचे निवेदन भारतीय जनकल्यान फॉउंडेशन ने दिले आहे. घरकुल सह इतर योजनेत अडचणी निर्माण झाल्यास शासकीय मुख्य कार्यालयात माहिती घ्यावी. तर जनतेने दिशाभूल न होता व जनतेने स्वत:ची फसवणूक टाळण्यासाठी भारतीय जनकल्यान फॉउंडेशन चे कार्यालय येथे संपर्क करून योग्य मार्गदर्शन घ्यावे अशी माहिती देण्यात आली आली आहे.