आॅलिम्पियाड निधीबाबतचे आरोप दिशाभूल करणारे;खर्च नियमानुसार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर :- पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, लाखांदूर येथील आॅलिम्पियाड परीक्षेसाठी प्राप्त निधीच्या वापराबाबत काही माध्यमांतून व सामाजिक माध्यमांवर पसरवल्या जात असलेल्या आरोपांना शाळा प्रशासनाने ठामपणे फेटाळून लावले आहे. परीक्षा विविध प्रशासकीय व तांत्रिक कारणांमुळे प्रत्यक्षात होऊ शकली नसली, तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी राबविण्यात आलेल्या विशेष मार्गदर्शन वर्गांवरच निधीचा नियमानुसार वापर करण्यात आल्याचे मुख्याध्यापकांनी स्पष्ट केले आहे.

शाळा प्रशासनाच्या माहितीनुसार, आॅलिम्पियाड परी क्षेची तयारी म्हणून इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनुभवी शिक्षकांमार्फत विशेष तासिका, अतिरिक्त मार्गदर्शन वर्ग आणि सराव उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षकांनी नियमित वेळेपलीकडे जाऊन परिश्रम घेतले असून, त्यासाठी झालेला खर्च शासनाच्या नियमांनुसार नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्तरावरील आॅलिम्पियाड नोंदणी प्रक्रियेदरम्यान उद्भवलेल्या तांत्रिक अडचणी तसेच ऐनवेळच्या प्रशासकीय बदलांमुळे विद्यार्थ्यांची नोंदणी अंतिम होऊ शकली नाही. त्यामुळे परीक्षा होऊ शकली नसली तरी विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा लाभ त्यांना मिळाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. शासनाकडून प्राप्त झालेला ३६ हजार ५०० रुपयांचा निधी संपूर्णपणे पारदर्शक पद्धतीने खर्च करण्यात आला असून त्यासंदभार्तील सर्व नोंदी,उपस्थिती पत्रके व खर्चाची कागदपत्रे उपलब्ध असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले आहे. काही व्यक्तींकडून वस्तुस्थिती न जाणता पालकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असून शाळेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याची खंत शिक्षकवर्गाने यावेळी व्यक्त केली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *