
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : अवैधरित्या जनावरांची वाहतुक करणारे पिकअप वाहन उलटल्याने वाहन चालकाने वाहन सोडून पळ काढला मात्र पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सैरावैरा पळालेली जनावरांना एकत्र करून त्यांचेवर वैद्यकीय अधिकाºयामार्फत उपचार करवून घेत जनावरांची गोशाळेत रवानगी केली. पोलीसांनी अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा नोंदवीत तपास सुरू केला आहे.
तिरोडा पोलीस सूत्रांकडून मिळालेले माहितीनुसार आज दिनांक २१ रोजी सकाळी ५.३० वाजता चे दरम्यान तिरोडा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तिरोडा गोंदिया मार्गावरील अदानी प्रकल्पाचे गेट क्रमांक दोन समोरील घुमाधावडा फाट्याजवळ भर रस्त्यावर एक पिकअप वाहन उलटल्याची माहिती मिळाली.त्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक दडस पाटील, शिपाई दिनेश कस्तुरे, स्वप्निल पटले, संदीप कोरे, हुड यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता भर रस्त्यावर पिकप वाहन क्रमांक एम एच ४० सीटी ३०८४ उलटले असल्याचे दिसून आले.पोलीसांनी क्रेनच्या सहायाने वाहन उचलून रस्ता मोकळा केला.
अपघातग्रस्त वाहनात सहा-सात जनावरे असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी परिसरात शोध घेतला असता त्यांना पाच जखमी जनावरे मिळून आल्याने या जनावरांवर पशु वैद्यकीय अधिकारी सोनवणे यांच्यामार्फत उपचार करून घेत सदर जनावरे लाखनी जवळील गोशाळेत पाठविण्यात आली. पळून गेलेले अज्ञात वाहन चालका विरोधात प्राण्यांचा अधिनियम तसेच महाराष्ट्र पशु अधिनियम अन्वये पोलीस शिपाई संदीप कोरे याचे फिर्यादीवरून गुन्हा नोंद करून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विनायक दडस पाटील करीत आहेत.