
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : साकोली वनपरिक्षेत्रातील सावरबंध नित्य क्षेत्रांतर्गत मौजा वळद येथे बुधवारी (३ जून) सकाळी एक बिबट मादी पाण्याच्या पाईपमध्ये लपून बसल्याचे आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. भोजराम भिवा बनकर यांच्या शेतालगत असलेल्या दुर्गाबाई डोह नहरखालील पाईपमध्ये बिबट असल्याची माहिती ग्रामपंचायत सरपंच सौ. माधवी बडवाईक यांनी वनविभागाला दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन आर. कटरे यांच्या नेतृत्वाखाली वनकर्मचाºयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची गर्दी होत असल्याने मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना दिल्या.
बिबट मानवी वस्तीच्या अत्यंत जवळ असल्याने बचावकार्यासाठी साकोली वनक्षेत्रातील वन्यप्राणी बचाव दल (शिघ्र कृती दल) पाचारण करण्यात आले. पथकाने परिस्थितीचा बारकाईने आढावा घेत पाईपच्या एका बाजूस पिंजरा उभारून नियोजनबद्ध कारवाई केली. अखेर काही वेळाच्या प्रयत्नांनंतर बिबट मादीला कोणतीही हानी न होता यशस्वीरित्या जेरबंद करण्यात आले. जेरबंद केलेल्या बिबटाची पशुवैद्यकीय तपासणी मेघराज तुलावी, पशुधन विकास अधिकारी, नवेगावनागझिरा व्याघ्र प्रकल्प यांनी केली. तपासणीत बिबट मादी पूर्णत: निरोगी व शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले. त्यामुळे संभाव्य धोका टळला असून ग्रामस्थांनीही सुटकेचा निश्वास सोडला. योगेंद्र सिंग, उपवनसंरक्षक भंडारा तसेच संजय मेंढे, सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन आर. कटरे, क्षेत्र सहाय्यक के. एस. शिवनकर तसेच वनरक्षक कु. पी. आर. अंबुले, ए. बी. तुरकर, बी. आर. गोंडउमरी, जी. एन. पाखमोडे, एस. जी. खंडागळे, एस. एन. मेश्राम, आरआरटी पथक, गावचे सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले. मानववन्यजीव संघर्षाच्या घटना घडल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, तसेच वन्यजीव दिसल्यास हेल्पलाईन क्रमांक १९२६ किंवा भंडारा वनविभाग नियंत्रण कक्ष क्रमांक ०७१८४-२५२२८३ वर माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.