
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : देशाच्या भावी पिढीला योग्य दिशा देणे ही वर्तमान काळात महत्त्वाची गरज आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे आवश्यक असून स्पर्धेच्या युगात यश व प्राविण्य मिळविण्यासाठी कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वास अत्यावश्यक आहे. शिक्षणाच्या वाढत्या व्यापारीकरणाच्या पार्श्वभूमीवर समाजातील प्रत्येक घटकाने जबाबदारीने पुढे येऊन भावी पिढी घडविण्याचे कार्य करावे, स्थानिक आमदार पटोले यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात आमदार नाना पटोले यांनी उपरोक्त प्रतिपादन करून सांगितले की, पर्यावरण संवर्धनासाठी, झाडे लावणे, झाडे जगविणे आणि वनसंपदा जपणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी असून निसर्गाचे संतुलन राखल्याशिवाय मानवी जीवन सुरक्षित राहू शकत नाही.
हरित क्रांती ही केवळ शेतकºयांसाठी नव्हे तर संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. आमदार नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त साकोली येथे आयोजित भव्य कार्यक्रमात लाखनी, लाखांदूर व साकोली तालुक्यातील एम.पी.एस.सी. तसेच दहावी व बारावी परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलेल्या एकूण ४३५ गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘सूर्यकिरण फाउंडेशन’ व नाना पटोले मित्रपरिवार यांच्या वतीने प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान आमदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आला करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्यात आली. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वडद आणि सुकळी येथे वृक्षा- रोपण उपक्रम राबविण्यात आला. आमदार पटोले यांनी स्वत: वृक्षारोपण करून वाढदिवस पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला. निसर्ग ही मानवाला लाभलेली अमूल्य संपत्ती असून तिचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे सांगत त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये खासदार प्रशांत पडोळे, आमदार सुधाकर आडबळे, आमदार अभिजित वंजारी, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हा परिषद अध्यक्षा कविता ऊके, माजी आमदार गोपाल अग्रवाल, दिलीप बनसोड, माजी आमदार चरण वाघमारे, सचिन शेंडे, सभापती शीतल राऊत, जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर, सूर्यकिरण फाउंडेशनचे संस्थापक असलम शेख, लाखनी तालुका अध्यक्ष योगराज झलके, साकोली तालुका अध्यक्ष अशोक कापगते, माजी सभापती मदन रामटेके तसेच भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर व इतर जिल्ह्यांतील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सर्व मान्यवरांनी आमदार नाना पटोले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि जनहितकारी कार्याचेमन:पूर्वक कौतुक केले. नाना पटोले मित्रपरिवार व ‘सूर्यकिरण फाउंडेशन’ च्या वतीने राबविण्यात आलेला गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा हा विद्यार्थ्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन देणारा ठरला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल साधण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.