
रामेश्वर राहांगडाले/ भंडारा पत्रिका गर्रा-बघेडा : तुमसर तालुक्यातील कारली गावात तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याची टंचाई जाणवत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. कडकडत्या उन्हात गावातील एक व्यक्ती बैलगाडीच्या साहाय्याने ड्रममध्ये पाणी भरून आणताना दिसून आली. या दृश्यामुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाईची गंभीरता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आधुनिक युगात अनेक ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या सुविधा उपलब्ध असल्या तरी काही ग्रामीण भागातील नागरिकांना आजही पाण्यासाठी मैलोनमैल प्रवास करावा लागत आहे. कारली गावातील संबंधित व्यक्तीने बैलगाडीवर मोठे ड्रम ठेवून दूरच्या जलस्रोतावरून पाणी आणण्याची कसरत केली. भर उन्हात हा प्रवास करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गावकºयांचे म्हणणे आहे की, उन्हाळ्यात विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावल्याने पाण्याची समस्या अधिक गंभीर बनते. त्यामुळे प्रशासनाने कारलीसह परिसरातील गावांमध्ये नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. कडक उन्हात बैलगाडीच्या साहाय्याने पाणी आणणाºया या व्यक्तीचे दृश्य ग्रामीण जीवनातील वास्तव आणि पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष अधोरेखित करणारे ठरत आहे.