पाहुणगावात प्रदूषणाविरोधात संतापाचा उद्रेक शेकडो ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर तालुक्यातील पाहुणगाव येथे सुरू असलेल्या साई गंगा राईस मिलमधून होत असलेल्या कथित वायू व जलप्रदूषणाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप आता टोकाला पोहोचला आहे. गावातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप करत सरपंच संदीप कोरे यांच्या नेतृत्वात शेकडो ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी तसेच पोलीस प्रशासनाला सादर करण्यात आले आहे. ग्रामपंचायत पाहुणगावकडून दिलेल्या निवेदनानुसार, गावालगत सुरू असलेल्या राईस मिलमधून मोठ्या प्रमाणात धूर, दुर्गंधीयुक्त वायू आणि दूषित पाण्याचा विसर्ग होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषत: लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पशुधन यांना याचा फटका बसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही प्रशासनाला वारंवार लेखी तक्रारी देण्यात आल्या होत्या. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय उरला नसल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्यानाहीत, तर ११ जून रोजी सकाळी ११ वाजता पासून साई गंगा राईस मिल परिसरात आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. या आंदोलनात गावातील महिला, युवक, शेतकरी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *