भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : नागपूर येथील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या ताब्यातून फरार झालेल्या चोरीच्या गुन्ह्यातील शातिर आरोपीला तिरोडा पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोधून काढत शिताफीने अटक केली. अटकेदरम्यान आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने झालेल्या झटापटीत एका पोलिस कर्मचाºयाच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर आरोपीला नागपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, एक्का उर्फ हर्ष महेंद्र रामटेके (वय २५) हा चोरीच्या गुन्ह्यात हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या ताब्यात होता. मात्र, २७ जुलै रोजी त्याने पोलिसांना चकवा देत पलायन केले. त्यानंतर नागपूर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली. आरोपी हा मूळचा तिरोडा येथील रहिवासी असल्याने तो तिरोड्यात येण्याची शक्यता गृहित धरून उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमित वानखडे यांनी आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कवडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
तांत्रिक तपासादरम्यान आरोपी रामटेक मार्गे तिरोड्याकडे येत असल्याची माहिती मिळाली. मंगळवारी (२८ जुलै) तो गजानन मंदिर परिस-रातून दुचाकीवरून सिंगाडा तलावाच्या दिशेने जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळताच पथकाने तातडीने सापळा रचला. उपनिरीक्षक संजय कवडे, हवालदार निलपत्रेवार, पोलीस शिपाई स्वप्निल पटले, विशाल मरकाम, फुले, पेशणे तसेच चालक पोलीस शिपाई अख्तर शेख यांनी आरोपीला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने पुन्हा एकदा पोलिसांना चकवा देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हवालदार निलपत्रेवार यांनी धाडसाने आरोपीवर झडप घातली. आरोपीने प्रतिकार करत त्यांना झटका दिल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली. तरीही पोलिसांनी प्रसंगावधान राखत आरोपीला जेरबंद केले. घटनेची माहिती मिळताच नागपूर येथील हुडकेश्वर पोलीस तिरोडा पोलीस ठाण्यात दाखल झाले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपासासाठी त्याला नागपूरला रवाना करण्यात आले. तिरोडा पोलिसांनी दाखविलेल्या तत्परता, तांत्रिक तपास आणि धाडसी कारवाईमुळे फरार आरोपीला अल्पावधीत अटक करण्यात यश आले असून या कारवाईबद्दल पोलीस दलाचे कौतुक होत आहे.