भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : कोट्यवधी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज करण्यात आलेले बिरसी विमानतळ सध्या प्रवासी विमानसेवेअभावी ओस पडले आहे. अत्याधुनिक धावपट्टी, रात्रीच्या विमान उड्डाणासाठी नाईट लँडिंगची सुविधा आणि विमान प्रवासासाठी उत्सुक असलेला मोठा प्रवासीवर्ग उपलब्ध असतानाही येथून प्रवासी विमानांचे उड्डाण बंद असल्याने विमानतळाच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोंदियासह मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील प्रवाशांना विमानसेवा पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा असतानाच खासदार प्रफुल्ल पटेल यांनी यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविल्याने नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. गोंदिया तालुक्यातील बिरसी येथे उभारण्यात आलेल्या विमानतळावरून वर्षभरापूर्वी स्टार एअर आणि इंडिगो या दोन विमान कंपन्यांनी प्रवासी विमानसेवेला सुरुवात केली होती.
गोंदिया-हैदराबाद आणि गोंदिया-इंदूर या दोन महत्त्वाच्या मार्गांवर विमानसेवा सुरू झाल्याने गोंदिया जिल्ह्यासह आसपासच्या सीमावर्ती भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला होता. सुरुवातीच्या काळात या सेवांना चांगला प्रतिसाद मिळत होता. दररोज सुमारे सव्वाशे प्रवासी विमानसेवेचा लाभ घेत असल्याची माहिती आहे. गोंदिया हे हावडा-मुंबई रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमेलगत असल्याने या शहराला भौगोलिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे.
गोंदिया, भंडारा जिल्ह्यांसह बालाघाट, राजनांदगाव आणि परिसरातील नागरिकांसाठी बिरसी विमानतळ सोयीचे ठरू शकते. व्यापार, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि पर्यटनाच्या दृष्टीनेही विमानसेवेची मोठी गरज आहे. त्यामुळे येथून नियमित विमानसेवा सुरू राहिल्यास या संपूर्ण भागाच्या आर्थिक आणि व्यावसायिक विकासाला चालना मिळू शकते. मात्र, वर्षभर नियमित सेवादिल्यानंतर संबंधित विमान कंपन्यांनी देखभाल-दुरुस्तीचे कारण पुढे करीत सुरुवातीला तीन महिन्यांसाठी विमानसेवा स्थगित केली. त्यानंतर या कंपन्यांनी येथून सेवा बंद केली. परिणामी, मागील सहा महिन्यांपासून बिरसी विमानतळावरून प्रवासी विमानांचे उड्डाण पूर्णपणे बंद आहे. विमानतळावर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध असतानाही विमानसेवा सुरू नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. विमान प्रवासासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांना नागपूर किंवा अन्य विमानतळांचा आधार घ्यावा लागत आहे.
