भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : साकोली वनपरिक्षेत्रातील जंगलांमध्ये दोन पट्टेदार वाघांचा मुक्तसंचार सुरू असल्याचे वनविभागाच्या ट्रॅप कॅमेºयांमध्ये टिपलेल्या छायाचित्रांवरून स्पष्ट झाले आहे. उमरी सहवनक्षेत्रातील महालगाव बिटात एका नर वाघाचा, तर सानगडी सहवनक्षेत्रातील सिरेगाव बिटात एका वाघिणीचा वावर असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही वाघांच्या हालचाली जंगलालगतच्या गावांच्या परिसरात वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी पाळीव जनावरांवर हल्ले करून त्यांची शिकार केल्याची माहिती पुढे आल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
वनविभागाच्या माहितीनुसार, नर वाघाचा महालगाव परिसरात नियमित संचार असून, वाघिणीच्या हालचाली पापडा, केसलवाडा आणि सिरेगाव बिटात आढळून आल्या आहेत. याशिवाय पळसगाव, नैनपूर, सालई आणि झाडगाव परिसरातील जंगलांमध्येही या दोन्ही वाघांच्या हालचाली असल्याचे सांगण्यात येते. त्यांचा वावर केवळ साकोली वन परिक्षेत्रापुरता मर्यादित नसून गोंदिया जिल्ह्यातील भिवखिडकी गावालगतच्या जंगलापर्यंत असल्याची माहिती आहे. नवेगावबांधलगतच्या बोदराई अभयारण्यातून हे दोन्ही वाघ या भागात आले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाघांच्या हालचालींची माहिती ट्रॅप कॅमेºयांमधून मिळाल्याने वनविभागासाठी त्यांच्या भ्रमणक्षेत्राचा मागोवा घेणे शक्य झाले आहे. मात्र, जंगलालगतच्या गावांमध्ये त्यांचावावर वाढत असल्याने स्थानिक नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. विशेषत: सकाळी आणि सायंकाळी शेतशिवारात जाणारे शेतकरी, शेतमजूर, गुराखी आणि जंगलावर अवलंबून असणाºया नागरिकांना सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
