भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असलेल्या तुमसर शहरात इलेक्ट्रिक बससाठी स्वतंत्र चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. तुमसर शहर हे कुबेर नगरी तसेच राईस सिटी म्हणून ओळखले जाते. मात्र, शहरातून सुरू असलेल्या इलेक्ट्रिक बससेवेसाठी चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे बसला चार्जिंगसाठी भंडारा येथे जावे लागते. त्यानंतर ही बस भंडारा येथून नागपूरकडे रवाना होते. तुमसरसारख्या महत्त्वाच्या शहरात चार्जिंग स्टेशन नसणे ही खेदजनक बाब असून, शहरातच चार्जिंग पॉइंट उभारण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
चार्जिंग स्टेशन सुरू झाल्यास इलेक्ट्रिक बससेवा अधिक सुरळीत होईल, बसचा अनावश्यक प्रवास व वेळ वाचेल, प्रवाशांना वेळेवर सेवा मिळेल तसेच भविष्यात तुमसरमधून नवीन इलेक्ट्रिक बसफेºया सुरू करण्यास मदत होईल. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागाच्या विभाग नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. तसेच चार्जिंग स्टेशनसाठी जागेची पाहणी करून तातडीने प्रशासकीय कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली आहे.
यावेळी सुधाकर कारेमोरे (जिल्हा समन्वयक), प्रकाश पारधी (उपजिल्हाप्रमुख), ईश्वर भोयर (तालुकाप्रमुख), प्रवीण गुप्ता (शहरप्रमुख), संजय झंझाड (वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख), पवन खवास (युवासेना तालुकाप्रमुख), सत्यनारायण कामथे (उपतालुकाप्रमुख), दिग्रस खडसे (विभागप्रमुख), जगन ताडेकर (उपविभागप्रमुख), कृष्णा रहांगडाले (विभागप्रमुख), शैलेश शेंद्रे (विभागप्रमुख), रोहित बागडे, आशिष मोहनकर, गिरधारी पटले, विशाल मेश्राम, अक्षय ठवकर तसेच तुमसर शहर व ग्रामीण भागातील अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
