गोंदियातील मांग गारुडी वस्तीच्या ३५ चिमुकल्यांची ‘मुंबई स्वप्नयात्रा’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- कालपर्यंत पोटाची खळगी भरण्यासाठी हातात कचºयाची गोणी आणि चुंबकाची काठी घेऊन भटकंती करणाºया कुडवा (ता. गोंदिया) येथील मांग गारुडी वस्तीतील ३५ चिमुकल्यांनी थेट राजभवनाची पायरी चढून नवा इतिहास रचला. ‘भटके विमुक्त कल्याणकारी परिषद, विदर्भ प्रांत’ संचलित ‘पालावरची शाळा’ येथील या विद्यार्थ्यांनी १० ते १५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान सहा दिवसांची ‘मुंबई स्वप्नयात्रा’ अनुभवली.

या सहलीत महामहिम राज्यपाल महोदयांनी सर्व राजशिष्टाचार बाजूला सारून या लेकरांशी मनमोकळा संवाद साधला आणि त्यांच्या भगवद्गीतागीतापाठांतराचे मनापासून कौतुक केले. तसेच पालावरच्या शाळेचे पालक सौ निर्मल बोरसे व प्रशांत बोरसे यांचाही याप्रसंगी गौरव केला. गोंदिया शहराच्या सावलीत असलेल्या कुडवा येथील मांग गारुडी वस्तीतील मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर होती. मात्र, २०१७ मध्ये परिषदेच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘पालावरची शाळे’ने गेल्या आठ वर्षांत ‘शिस्त-संस्कार-अभ्यास’ या त्रिसूत्रीतून या मुलांच्या हातात भिक्षापात्राऐवजी वही-पुस्तके दिली. याच मुलांचे जग पालापुरते मर्यादित राहू नये, या ध्यासातून या सहलीचे आयोजन करण्यात आले. भटक्या समाजातील मुलींना संधी मिळावी, यासाठी सहलीत मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक ठेवण्यात आली होती.

राज्यपालांकडून पुणे राजभवनाचे निमंत्रण

मांग गारुडी समाजातील मुले इतिहासात पहिल्यांदाच राजभवनात पोहोचली होती. मुलांनी स्वागताप्रसंगी सादर केलेल्या भगवद्गीतेच्या १५ व्या अध्यायाच्या पाठांतराने महामहिम राज्यपाल भारावून गेले. मुलांसोबत बसून नाश्ता करत त्यांनी त्यांना पुणे येथील राजभवनावर येण्याचेही आग्रहाचे निमंत्रण दिले. यासोबतच मुलांनी लोकशाहीचे मंदिर असलेले मंत्रालय आणि विधान भवन पाहिले तसेच मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये अधिकाºयांच्या थाटात भोजनाचा आस्वाद घेतला. सहलीदरम्यान मुलांनी नेहरू सायन्स सेंटर, वांद्रे-वरळी सी लिंक, गिरगाव चौपाटी, मरीन ड्राईव्ह,सिद्धिविनायक मंदिर, वॉटर किंग्डम आणि फिल्मसिटीची सफर केली.

पहिल्यांदाच अथांग समुद्र पाहताना आणि वॉटर किंग्डममध्ये मनसोक्त बागडताना या लेकरांच्या चेहºयावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ही सहल यशस्वी होण्यामागे अनेकांचा मोलाचा वाटा राहिला. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धवराव काळे आणि मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) कैलास अंडील यांच्या समन्वयामुळे मंत्रालय, विधान भवन आणि राजभवनातील सुरक्षा व प्रोटोकॉलची प्रक्रिया सुलभ झाली. मुंबईतील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रसाद शेट्टी आणि सौ. शेट्टी यांनी कोणतीही पूर्वओळख नसताना मुलांच्या जेवणाची, फिरण्याची आणि आरोग्याची आपल्या पोटच्या लेकरांप्रमाणे काळजी घेतली. आरे कॉलनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत शिपूरकर यांनी मुलांच्या निवासाची व फिल्मसिटी सहलीची उत्तम व्यवस्था करत रात्री उशिरापर्यंत थांबून मुलांसोबत स्नेहभोजन केले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *