बिबट्याच्या हल्ल्यात २ शेळ्या व १ बोकड ठार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : रात्रीच्या सुमारास सर्वत्र सुनसान असल्याचा फायदा घेत बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या जनवरांपैकी २ शेळ्यांवर हल्ला चढवीत त्यांना ठार केले. तर, त्याच रात्री येथीलच अन्य एका पशुपालकाच्या गोठ्यातील एका बोकडावर हल्ला चढवित त्याला ठार केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील चिचोली येथे २० सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या गोठ्यात आणखी ५ ते ६ शेळ्यांसह बोकळ बांधले होते. मात्र, बिबट्याच्या हल्ल्याने जनावरांचा आरडाओरड ऐकू येताच घरातील सदस्यांना जाग आली असता सदर बिबटने घटनास्थळावरून पळ काढला. शालिक समरत, रा. चिचोली असे २ शेळ्या ठार केलेल्या नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव आहे. तर लाला दिघोरे, रा. चिचोली असे एक बोकड ठार केलेल्या नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, शालिक समरत यांच्या गोठ्यात नेहमीप्रमाणे त्यांची जनावरे बांधली.

घटनेच्या दिवशी तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असता सर्व घरातच असल्याच्या संधीचा फायदा घेत रात्री ९ वाजताच्या दरम्यान शिकारीच्या शोधात गावात शिरकाव केलेल्या एका बिबट्याने अचानक शालिक समरत यांच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यावर हल्ला चढवित २ शेळ्या ठार केल्या. तर,त्याच रात्री येथीलच लाला दिघोरे नामक पशुपालकाच्या गोठ्यात बांधलेला एक बोकडावर सुद्धा बिबट्याने हल्ला चढवीत ठार केला. दरम्यान, बिबट्याचा हल्ल्याने गोठ्यातील जनावरांचा कलकलाट ऐकून नुकसानग्रस्त पशुपालक शालिक समरत यांनी गोठ्याकडे जाऊन बघितले असता त्यांना बिबट गोठ्यातील शेळ्यांवर हल्ला करताना दिसला. त्यामुळे, सदर पशुपालकाने आरडाओरड केली असता बिबट्याने घटनस्थळावरून पळ काढला. सदर घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांच्या मार्गदर्शनात लाखांदूर वन विभागाच्या चमूने घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. या घटनेतील शालिक समरत यांचे अंदाजे २० हजाराचे तर लाला दिघोरे यांचे १२ हजाराचे नुकसान झाले असून पशुपालकांसह ग्रामस्थांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *