गॅस दरवाढी च्या विरोधात महिला काँग्रेस चे आंदोलन; मातीच्या चुली वाटून केला केंद्र सरकारचा निषेध

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी चंद्रपूर: केंद्र सरकारने घरगुती गॅसची किंमत ५० रुपये आणि व्यावसायिक गॅस ची किंमत ३५० रुपये वाढवल्याने आता १४ किलो घरगुती गॅसची किंमत ११०३ रुपये झाली आहे तर १९ किलो व्यावसायिक गॅसची किंमत २११९ रुपये इतकी झाली आहे. या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे महागाई मुळे कंबरडे मोडले आहे. या दरवाढीच्या विरोधात चंद्रपूर महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (दि. २) महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सवालाखे यांच्या सुचनेनुसार आंदोलन करण्यात आले. महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य-ठेमस्कर यांच्या नेतृवात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी महिला काँग्रेसच्या वतीने मातीच्या चूली महिलांना वितरित करण्यात आल्या. व चुलीवर भाकरी थापून निषेध करण्यात आला. तसेच थाळी वाजवून महिलांनी नरेंद्र मोदी मुदार्बाद,नरेंद्र मोदी हाय हाय, निषेध असो निषेध असो केंद्र सरकारचा निषेध असो अशा घोषणा दिल्या.

त्रिपुरा, नागालँड, मेघालय या ईशान्येकडील राज्यातील विधानसभा निवडणुका झाल्या बरोबर मोदी सरकारने गॅस दरवाढ केली. यावरून मोदी सरकारचा हेतू दिसून येतो. हे सरकार जनसामान्यांसाठी शाप आहे. होळीसारखा सण तोंडावर असतांना केंद्र सरकारने सामान्य माणसाच्या तोंडाला पाने पुसलीत. गॅस दरवाढ करून गरीब व्यावसायिकांना आणखी हताश केले. या सरकारचा एकच मंत्र आहे “गरिबोकीलूट,मित्रो को खुली छूट” असून मोदी सरकारचा हा अमृतकाळ नसून मित्रकाळ आहे. हे सरकार उद्योगपतींचे आहे. गोरगरीब जनतेचे नाही, मोदी सरकारला सामान्य जनतेचा थोडा जरी विचार असेल तर तत्काळ ही दरवाढ मागे घ्यावी. केंद्र सरकारमध्ये ११ महिला मंत्री आहे. पण त्यातील सर्व आता तोंडाला पट्टी लावून आहे. ४१४ रुपये सिंलिंडर असतांना रस्त्यावर बसणाºया स्मृती इराणी आता मात्र एक शब्दही बोलत नाही. असे हे असंवेदनशील सरकारअसून जनता आता निवडणुकीत या अन्यायी आणि जुलमी सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया नम्रता आचार्य- ठेमस्कर यांनी यावेळी दिली.

आंदोलनानंतर जिल्हाधिकारी सी.गौडा यांना ही दरवाढ मागे घेण्यात यावी, या साठी निवेदन देण्यात आले. या आंदोलनाला महिला काँग्रेस च्या उपाध्यक्षा सुनीता धोटे, उपाध्यक्ष शितल कातकर, सेवादल महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्ष लता बारापात्रे, बल्लारपूर तालुका अध्यक्ष अफसाना सयद, शहराध्यक्ष मेघा भाले, राजुरा महिला काँग्रेस च्या तालुका अध्यक्ष कविता उपरे, शहराध्यक्ष संध्या चांदेकर, मूल तालुका अध्यक्ष रुपाली संतोषवार, माजी नगरसेविका संगीता भोयर तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *