झाडीपट्टी रंगभूमीस शेखर डोंगरे यांचे योगदान मोलाचे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : ४० वर्षापासून झाडीपट्टी रंगभूमीच्या रसिक मायबाप प्रेक्षकांचे मनोरंजन व प्रबोधन करणारा कलावंत म्हणजेच प्रा. डॉ. शेखर डोंगरे होय. डोंगरे यांनी वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने झाडीतील जनतेला खळाळून हसायला लावले. अध्यापन, संशोधन, अभिनय, दिग्दर्शन, निर्माता अशा पंचरंगी क्षेत्रात लौकिक निर्माण करणाºया कलावंताचे योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते प्रा.डॉ.शेखर डोंगरे गौरव ग्रंथ संपादक मंडळ आणि समितीच्या वतीने शेखर डोंगरे यांच्या षष्ठयब्दीपूर्ती निमित्त आयोजित नव्वदोत्त्तर झाडीपट्टी रंगभूमी, चिंतन आणि चिकित्सा गौरव ग्रंथ प्रकाशनसमारंभ प्रसंगी बोलत होते. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्ष ज्येष्ठ नाट्य समीक्षक तथा रंगकर्मी प्राचार्य डॉ.श्याम मोहरकर होते.
नव्वदोत्तर झाडेपट्टी रंगभूमी, चिंतन आणि चिकित्सा या गौरव ग्रंथांचे आ. विजय वडेट्टीवार यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यास भारत सरकारच्या गीत व नाट्य विभागाचे माजी संचालक समीक्षक, नाट्य अभ्यासक डॉ. नीलकांत कुलसंगे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. नरेश गडेकर, प्रसिद्ध गायक, प्रबोधनकार, नाटय अभिनेता व दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर, प्रसिद्ध नाट्य व सिने अभिनेता देवेंद्र दोडके, नाट्य अभ्यासक, समीक्षक दुर्गेश रवंदे नांदेड, गौरवमूर्ती प्रा.डॉ.शेखर डोंगरे, सौ प्रज्ञा डोंगरे, प्राचार्य धमानी आदीं उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, या बहुगुणी नटाने चौफेर नजर ठेवत स्वत:ला व प्रेसला अपडेट ठेवले.
नाट्य कलाविषयक निष्ठा सांभाळत मार्गक्रमण करून उत्तमोत्तम नाटके चंद्रकमल थियटरच्या माध्यमातून रंगभूमीवर आणली. चार हजार पेक्षाही अधिकनाटकांतून विविध भूमिका वैशिष्ट्यपूर्ण अदाकारीने साकारून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या कलावंताने भूक, फाटका संसार सारख्या नाटकातून अभिनयाची चुणूक दाखवत प्रेक्षकांना हसविले असून झाडीपट्टीतील प्रत्येक गावात शेखर डोंगरेचे फॅन आहेत. शेखर डोंगरे यांच्या गौरवार्थ झाडी पट्टीचा समग्र इतिहास संकलित करून नवा आयाम निर्माण केला, असे मत आ.वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. राजकुमार मुसणे यांनी तर प्रस्ताविक डॉ.जनबंधू मेश्राम यांनी केले उपस्थितांचे आभार डॉ. धनराज खानोरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता तेजस, डॉ. प्रवीण डोंगरे, चिदानंद सिडाम, लोकेश कुमार, स्वप्निल, मंगेश मेश्राम, सुरभी, श्रुती यांनी परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.