वैनगंगेच्या काठावरील पुरातन मंदिर; गावकºयांचे श्रद्धास्थान

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील निलज बु.येथे हनुमान जयंतीला नदीकाठावरील पुरातन मंदिरात आयोजित गोपाळकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी सार्वजनिक देवस्थानकमेटीच्या वतीने हनुमान जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात घटस्थापना, हनुमंताची महापूजा व नंतर भजनांच्या कार्यक्रम घेण्यात आला. तसेच सकाळी हनुमान चालीसा, रामरक्षा, भीमरूपी व इत्यादी स्तोत्रांचे पठण पार पडले. यानंतर हभप धनराज गाढवे महाराज यांचे गोपालकाल्याचे कीर्तन करण्यात आले होते. याप्रसंगी गावातील भाविक, महिला मंडळी, बालगोपाल उपस्थित होते. दहीहंडीचे पूजन करून आरती व प्रसाद असे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास देवस्थान कमेटी अध्यक्ष इस्तारी गाढवे, उपसरपंच भाऊराव बुधे, दुधाराम माटे, गुजोबा गाढवे, शंकर कांबळे, विनेश बांते, रामू कनपटे व गावकरी उपस्थित होते. निलज बु. येथील हनुमंताची मूर्ती प्राचीन काळापासून आहे.
ग्रामदैवत म्हणून हनुमंताला पूजेचा पहिला मान प्राप्त आहे. पूर्वी निलज बुज. हे गाव वैनगंगेच्या काठावर वसले होते. तेव्हा नदीकाठावर हनुमंताचे मंदिरही होते. परंतु, दरवर्षी वैनगंगेला मोठा पूर येत असल्यामुळे लोकांचे नुकसान होत होते. त्यामुळे गावातील प्रमुख व्यक्तींनी मिळून नदी काठापासून दूर बसविले. परंतु, हनुमंताचे मंदिर जुन्याच ठिकाणी राहिले. तेव्हा गावातील धर्मा बडगे नावाचे एक वारकरी हनुमंत भक्तहोते. त्यांना आपण हनुमंताला गावात आणावे असे वाटत होते. एके दिवशी त्यांना हनुमंताने स्वप्नात दिलेल्या दृष्टांतानुसार त्यांनी हनुमंताची मूर्ती नदीकाठावरील मंदिरातून गावात तयार केलेल्या एका चबुतºयावर आणली. यापूर्वी गावकºयांनी मूर्ती गावात आणण्याचे बरेच प्रयत्न केले होते. परंतु, मूर्ती उचलल्या जात नव्हती. आता धर्मा बाबांनी मूर्ती कशी आणली? असा प्रश्न लोकांना पडला. त्यांनी त्यांचा विरोध केला. त्यामुळे आपली चुक झाली असे समजून धर्मा बाबांनी मूर्ती परत नदीकाठावर नेऊन ठेवली. त्यानंतर कोणीही मूर्ती हलवू शकले नाही.त्यामुळे आजही हनुमंताची मूर्ती नदीकाठावरील मंदिरातच आहे.गावातील लोक तिथे जाऊन पूजापाठ करतात.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.