खांबावरील हायमास्ट लाईट बंदने मुख्य चौकात अंधाराचे साम्राज्य

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शहराचा प्रवेशद्वार म्हणुन संबोधल्या जाणा-या तुमसर-भंडारा व रामटेक-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील खापा मुख्य चौकातील खांबावरील हायमास्ट लाईट गत काही दिवसापासून बंद असल्याने खापा चौफुलीवर पूर्णत: अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. येथे येणा-या व जाणा-या वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व संबधित कंत्राटदारांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांना व वाहनचालकांना आपला जिव गमवावा लागत आहे. मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचे काम काही वर्षाआधीच पूर्ण झाले. यात महामार्गावरील प्रत्येक चौकामध्ये मोठ-मोठे हायमास्ट लाईट लावण्याचे काम कंत्राटदाराला मिळाले आहेत. तुमसर शहराचा प्रवेशव्दार म्हणून संबोधल्या जाणा-या खापा चौकात मोठे हायमास्ट विद्युत खांब उभारुनत्यावर लाईट लावले गेले आहेत. मात्र येथील खांबावरील लाईट अद्याप सुरू नसल्याने येथील नागरीकांना व वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे फुटपाथ व दुभाजकावर लाईटलावण्याचा काम सुरू असले तरी ते काम सुद्धा कासवगतीने सुरू आहे.

त्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे. अंधारामुळे वाहन चालकांना अपघातात आपला जीव गमवावा लागत आहे. खापा चौकातून तुमसर-भंडारा व रामटेक- गोंदिया हे राष्ट्रीय मार्ग छेदत गेले आहेत. येथे चारही मार्गाने जड व अवजड वाहने रात्री भरधाव वेगाने धावत असतात. त्यावेळी लहान वाहनचालकांना मार्गावरील अवजड वाहने दृष्टीस पडत नसल्याने येथे अपघात होत असतात. काही दिवसांपूर्वी या चौकातील परिसरात तुमसर येथील व्यापारी ट्रकच्या धडकेत ठार झाल्याची घटना घडली. तरी सुध्दा हायमास्ट लाईट अद्यापही बंद अवस्थेत आहेत. सदर खापा चौकातील बंद असलेले हायमास्ट लाईट त्वरीत सुरु करण्यात यावे अन्यथा खापा चौकात आंदोलन करण्याचा इशारा संताजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विक्रम लांजेवार यांनी निवेदनातून दिला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *