विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून जाऊ नये- हटवार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करीत शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता विद्यार्थी सतत प्रयत्न करत असतात. परिणामी परीक्षेत कमी गुण प्राप्त विद्यार्थी व पालकाचे समुपदेशन होऊन त्यांच्या मनातील शंका, समस्यांचे निराकारण करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन येत असते. तसेच विद्यार्थी जीवनात यश- अपयश हे नेहमी पाठलाग करीत असते. त्यामुळे अपयश मिळाल्यानंतर खचून न जाता यशाचा पाठलाग करून नाव लौकीक करावे. कारण जीवनात परीक्षा ही अंतिम नसते. म्हणून विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करून शैक्षणिक क्षेत्रात भरारी घ्यावी असे प्रतिपादन सहाय्यक शिक्षक तथा समुपदेशक डी. आर. हटवार यांनी केले.

ते जिल्हा परिषद जकातदार विद्यालय भंडारा येथे इयत्ता १० वी मध्ये कमी गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या समुपदेशन मेळाव्यात मार्गदर्शन करतांना बोलत होते. समुपदेशन मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद जकातदार शाळेचेप्राचार्य एम. जी. कुर्झेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक शिक्षक डी. आर. हटवार, धनंजय बिरणवार इत्यादी विद्यार्थी- पालक उपस्थित होते. जिल्हा परिषद जकातदार शाळेचे प्राचार्य एम. जी. कुर्झेकर म्हणाले की, जिद्द, चिकाटी व मेहनतीने पुढील शैक्षणिक कर्तव्य पार पाडून ध्येयपूर्ती करा. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार अभ्यासक्रमाचे क्षेत्र निवडून पुढील प्रवेश घ्यावा व शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घ्यावी. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण पडले त्या विद्यार्थ्यांच्या शंकाचे निराकरण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जकातदर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थींनींनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *