ग्रीनफ्रेड्स नेचर क्लबचा सारस पक्षी गणनेत सहभाग

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मागील २३ वर्षांपासून सातत्याने अनेक पक्षीविषयक कृतिशील उपक्रम राबिवणारे, दरवर्षी ऋतुनुसार उन्हाळी, पावसाळी, हिवाळी तसेच स्थलांतरित पक्षीगणना उपक्रम असे वर्षाचे चार पक्षीगणना उपक्रम तसेच साप, फुलपाखरे, दुर्मिळ पक्षी, कीटक आणि सरपटणारे प्राणी याविषयी कृतिशील उपक्रम, निसर्गजागृती, पर्यावरण संवर्धनासाठी वर्षभर विविध उपक्रम सातत्याने राबवून विदर्भातच नाहीतर महाराष्ट्रात नावारूपास आलेल्या ग्रीनफ्रेड्स नेचर क्लब लाखनी- साकोली (जिल्हा भंडारा) ने यावर्षी सुद्धा वनविभागाने राबविलेल्या सारस पक्षी गणना २०२३ मध्ये सहभाग नोंदविला. यात वनविभागाने नेमून दिलेल्या भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा, खमारी बुटी, कोकणागड, डोडमाझरी या ठिकाणावर वनविभाग कर्मचारी, बिटरक्षक यांच्यासमवेत सारस पक्षीगणना केली. या चारही ठिकाणी अपेक्षेप्रमाणे सारस जरी आढळले नाही तरी अनेक पक्ष्यांची, फुलपाखरांची तसेच जैवविविधतेची नोंद घेण्यात आली. २ वर्षांपूर्वी सुद्धा सूचनेनुसार ग्रीनफ्रेड्सचे सदस्यांनी सिहोरा बपेरा जवळील सारस आढळलेल्या ठिकाणी दोन सारसाची नोंद घेतली.

मागील वर्षी तीन तर यावर्षी गोंडीटोला तलाव व शेती क्षेत्रात वनविभागातर्फे नियुक्त सारसमित्रांनी चार सारसाची नोंद मार्च महिन्यापासून घेतली होती व आताही त्यांना चार सारस आढळले आहेत यात दोन परिपक्व असून दोन कमी वयाचे समवयस्क आहेत हे येथे उल्लेखनीय. आमगाव शिंगोरी तलाव क्षेत्रात सर्पमित्र धनंजय कापगते, कोकणागड तलाव येथे सर्पमित्र नितीन निर्वाण कापगते, डोडमाझरी तलाव येथे सर्पमित्र पंकज भिवगडे तर सुरेवाडा, खमारी बुटी नदीपात्र बॅक वॉटर क्षेत्रात ग्रीनफ्रेड्स नेचर क्लबचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने, पक्षीनिरीक्षक विद्यार्थीनी रुणाली निंबेकर, पूर्वा बहेकार, रोहिणी भैसारे, बिटरक्षक मॅडम शितल मेश्राम इत्यादीनी ३ तास पाच किमी चालून विविध पक्षी, फुलपाखरे तसेच जैवविविधतेची नोंद घेतली. सारस पक्षीगणनेच्या निमित्ताने विविध ३५ प्रकारच्या पक्ष्यांच्या नोंदी यात विशेषत: स्मॉल प्रांटीकोल,स्पॉट बिल डक, ब्लॅक आयबीस, लेसर व्हीसलिंग टिल, व्हाइट नेकेड आयबीस, रिव्हर टर्न, ओपन बिल स्टार्क, गोल्डन ओरिअल इत्यादी विशेष पक्ष्यांच्या व इतर ३० सर्वसामान्यपणे आढळणारे पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात आल्या याबद्द्ल अधिक माहिती देताना ग्रीनफ्रेंडसचे कार्यवाह प्रा अशोक गायधने यांनी सांगितले की ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब कोणत्याही शासकीय किंवा मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पर्यावरण संस्थांचा निधी न घेता सुद्धा स्वयंप्रेरीत, स्वयंभू पद्धतीने अनेक पक्षी- प्राणी विषयक उपक्रम अखंडपणे मागील २३ वर्षांपासून राबवित आहे.

सारस पक्षी जागृतीचे कार्य ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबतर्फे २०००-२००१ पासूनच भंडारा- गोंदिया जिल्ह्यात घेतले जात आहे. २० वर्षापूर्वी इटियाडोह जवळील बोंडगाव सुरबन येथील तलाव क्षेत्रातील लागोपाठ दोन वर्षं सारस अंडे चोरी प्रकरणाबाबत मोठा आवाज सुद्धा ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबने त्यावेळी उठविला होता व वनविभागाने काढलेल्या सारस जागृती यात्रेला मदत केली होती. एव्हढेच नव्हेतर इंटरनॅशनल क्रेन फाऊंडेशन (आय सी एफ) च्या माध्यमातून सारस चित्रकला स्पर्धा सुध्दा नंतरच्या वर्षात अनेकदा आयोजित केलेली आहे. तसेच २००६ ला वनविभागातर्फे राज्यात राबविण्यात आलेल्या ‘माळढोक पक्षी गणना’ उपक्रमात सहभाग घेतला होता.

यासोबत दरवर्षीच्या स्थलांतरित पक्षी गणना तसेच प्राणीगणना उपक्रमात सहभाग नोंदविलेला आहे. याव्यतिरिक्त वषार्चे तीन ऋतूनुसार तीन पक्षीगणना साकोली व लाखनी शहरात मागील २२ वर्षापासून दरवर्षी ग्रीनफ्रेंड्स तर्फे घेण्यात येत असते.त्याचबरोबर २००१ पासून दरवर्षी नि:शुल्क उन्हाळी १० दिवसीय पक्षी व निसर्ग अभ्यास शिबिराचे व तर नोव्हेंबरमधील पक्षीसप्ताहाच्या निमित्ताने हिवाळी नि:शुल्क सात दिवसीय पक्षीशिबिराचे दरवर्षी आयोजन सुद्धा करण्यात येत असते अशी सुद्धा माहिती त्यांनी यावेळी पुरविली आहे. ग्रीनफ्रेंड्सच्या पदाधिकाºयांनी सारस गणनेत सहभागी झाल्याबद्दल सदस्यांचे तसेच आयोजनाबद्दल वनविभागाचे अभिनंदन केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *