असाध्य आजाराने तिचे स्वप्न हिरावले

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तिला पारिजातकाच्या फुलासारखे आयुष्य मिळाले. प्राजक्ताने आपल्या अल्पायुष्यात सुगंधाची बरसात केली. तिचे लहानपणा पासून गुणगान होत होते. पण, तिच्या आयुष्या मार्गाच्या प्रवासात तिला असाध्य आजाराने पछाडले. तीन वर्ष ती त्या आजारांशी झुंज देत होती. अखेर तिने कायमचा श्वास सोडला. ‘मुलांचे पाय पाळण्यात दिसतात’ असे बोलले जाते. याचा प्रत्यय तिच्या आई वडिलांना आला होता. लहानपणा पासून दरवळणारा ‘प्राजक्ता’ चा तो सुगंध आज देवाने हिरावून घेतला. मोहगाव देवी येथील उत्तम शिवणकर याची थोरली मुलगी प्राजक्ता हिचा एका असाध्य आजाराने निधन झाले. महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल मोहगाव देवी येथे आठवीत प्राजक्ता शिवणकर हिने २०२०-२०२१ या शैक्षणिक सत्रात प्रवेश घेतला होता. ही मुलगी अभ्यासात अतिशय हुशार होती. ती मुलगी आई – वडील व शाळेचा नाव उंचावेल असं वाटत होते. भाषण, संभाषण, वक्तृत्व व लेखनात ती सर्वांच्या समोर होती. पण, या गोड मुलीला आठवीपासून एका असाध्य रोगाने पछाडले.

आई वडिलांनी तिच्या प्राथमिक उपचार केला. मोहाडी ग्रामीण रुग्णालय, भंडारा येथील शासकीय रुग्णालय व नागपूर येथील मेयो हॉस्पिटल व काही खाजगी उपचार होत होते. प्राजक्ता हिला शिक्षणाची खूप ओढ होती. तिला शाळा बुडवायला आवडत नव्हते. सर,मला खूप शिकायचे आहे. मला माज्या वडिलांची परिस्थिती बदलायची आहे अशी ती सांगत होती. ती नववीत असताना दत्तक परिक्षेत प्रथम आली होती. तिला कान्हळगाव येथील माजी सरपंच बाळू बोबडे यांनी दहावीत २०२२- २०२३ या शैक्षणिक सत्रात दत्तक घेतले होते. तिला सगळ्या अभ्यासाच्या सुवीधा पुरविण्यात आल्या होत्या. पण, नियतीच्या मनात वेगळेच होते. तिचा तो आजार वाढतच होतो. तिचे बाबा -आई नागपूर मध्ये राहून तिच्यावर उपचार करीत होते. ती खूप अशक्त झाली होती. अशा स्थितीत ती आपल्या बाबांना घेवून शाळेत आली होती.

मला शिकायचं आहे. मला वर्गात बसायचं आहे. हा हट्ट ती करीत होती. ती मुलगी तीन – चार दिवस शाळेत आली. पण,तिला नंतर येणे अवघड होवू लागले. अशाही परिस्थिती ती घरी स्व -अध्ययन करू लागली. दहावीच्या परीक्षेची तयारी करू लागली. तिचा प्रबळ आत्मविश्वास बघून तिचा दहावीचा परीक्षेचा फार्म मुख्याध्यापकांनी भरून घेतला. पण, तिचा अधिक अशक्तपणा व चालण्यास ती सक्षम नव्हती. त्यामुळे ती शाळा अंतर्गत व बोर्डाची परीक्षा देवू शकली नाही. परीक्षा देता आली नाही हा शल्य प्राजक्ताच्या मनात येत होता. असाच तो आजार वाढत – वाढत गेला. अन् सोमवारी सकाळी तिने घरीच कायमचा श्वास सोडला. या गुणी व हुशार लेकीच्या जाण्याने आई सैरभैर झाली. लेकिच्या भवितव्याचे रंगवलेले स्वप्न अपूर्ण राहिले अशी प्रतिक्रिया गावात दिसून येत होती. महात्मा ज्योतिबा फुले शाळेने परिपाठाच्या वेळी प्राजक्ताला दोन मिनिटे स्तब्ध राहून आदरांजली वाहिली. प्राजक्ताच्या मागे आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *