चुलत पुतण्याने केला काकूचा खून!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : शेतीच्या जुन्या वादातून चुलत पुतण्याने वृद्ध काकूचा नाक, तोंड, गळा दाबून खून केला. देवलाबाई किसन गेडाम (वय ५५, रा. पालांदूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया देवरी (गोंडी) या महिलेचे नाव आहे. देवरी-किटाडी वनपरिक्षेत्रातील डांबरीकरण रस्त्याच्या कडेला महिलेचा खून झाल्याची घटना १ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. २ आॅगस्ट रोजी पोलिस पाटील यांनी महिलेचा मृतदेह पाहून पालांदूर पोलिसांना माहिती दिली आणि ५ आॅगस्ट रोजी सायंकाळी हत्येचे गूढ उकलताना पोलिसांनी आरोपी स्वप्नील अभिमान गेडाम (३१) याला ताब्यात घेतले. तो किटाडी गावचा रहिवासी आहे. देवलाबाई गेडाम या जंगलात फिरून रानभाज्या गोळा करायच्या. किटाडी येथील गेडाम कुटुंबात तिचा विवाह झाला होता. लग्नाच्या दोन-तीन वर्षांनी पतीच्या निधनामुळे देवलाबाई देवरी/गोंडी या गावी तिच्या माहेरी राहायला आल्या होत्या. पतीच्या निधनानंतर वारस देवलाबाईचे नाव सासरच्या शेतजमिनीवरील सातबारावर नोंदविण्यात आले.

शेतीच्या वाट्यावरुन पतीचा चुलत भाऊ अभिमान जयराम गेडाम याच्याशी वाद झाला. देवलाबाई निपुत्रिक होत्या, त्यामुळे तिच्या पतीच्या चुलत भावाला देवलाबाईला शेतीचा हक्क द्यायचा नव्हता. हा वाद अजूनही न्यायप्रविष्ट आहे. आरोपी स्वप्नील हा अभिमान गेडाम यांचा लहान मुलगा आहे. घटनेच्या दिवशी आरोपी स्वप्नीलने देवलाबाईला देवरी-किटाडी रस्त्यावरील जंगलात मशरूम गोळा करताना पाहिले. स्वप्नीलने त्याला शेतीच्या जुन्या वादाबद्दल विचारले. त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्याचवेळी स्वप्नीलने तिच्या गालावर दोन-तीनदा चापट मारून तिला जमिनीवर पाडले. यानंतर त्याने देवलाबाईचे नाक, तोंड व गळा दाबून खून केला. घटनेच्या दिवशी ही बाब उघड झाली नाही. २ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता पोलीस पटील यांनी देवरी/गोंडी किटाडी रस्त्यावरील जंगल परिसरात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पालांदूर पोलीस स्टेशनला दिली. ठाणेदार व्ही.एम. चहांदे हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि प्रत्यक्ष परिस्थिती पाहून त्यांना संशय आला. पालांदूर पोलिसांनी २ आॅगस्ट रोजी तक्रार दाखल केली. पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अतिरिक्त पोलिस अधिकारी ईश्वर कातकाडे, सहायक पोलिस अधीक्षक सुशांत सिंग यांनी ही घटना गांभीर्याने घेत संशयास्पद मृत्यूची उकल करण्यासाठी महिलेचे शवविच्छेदन आधी लाखनी, नंतर भंडारा आणि शेवटी नागपुरात करण्यात आले.

पोलीस स्टेशन साकोलीचे ठाणेदार चहांदे हे स्वत: तिथल्या वैद्यकीय अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली शवविच्छेदनासाठी नागपूरला पोहोचले असता, देवलाबाईचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचे समोर आले. यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. गुप्त माहितीवरून पोलिसांना समजले की, आरोपीने दोन दिवसांपूर्वी देवलाबाईला किटाडी गावात दिसणार नाही आणि शेतीचा वाद संपुष्टात येईल, असे चर्चेत सांगितले होते. आरोपीच्या या चर्चेबाबत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. आरोपी स्वप्नील अभिमान गेडाम याने खुनाची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सपोनि चहांदे, उपनिरीक्षक राजकुमार मडावी, सहायक फौजदार ओमप्रकाश केवट, पो.शे. नावेद पठाण आणि भालचंद्र आंदेल या प्रकरणाचा तपास करत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *