पोहरा येथे १० दुर्मिळ पट्टेदार मण्यार सापांना जीवदान

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनीचे पोहरा येथील सर्पमित्र दर्वेश दिघोरे, वाइल्ड लाईफ रेस्क्यूअर मयुर गायधने यांचे सहकार्याने मागील १५ दिवसात १० पेक्षा जास्त दुर्मिळ पट्टेरी मण्यार अर्थात ‘बँडेड क्रेट’ साप विविध ठिकाणी आढळलेले होते. त्यांची सुरक्षित सुटका करून नैसर्गिक अधिवासात त्यांना मुक्त करण्यात आले. काही ठिकाणी ओसाड विहिरीत पट्टेरी मण्यार असल्याने अत्यंत धाडसाने व प्रखर मेहनतीने त्यांना रेस्क्यू मोहीम राबवावी लागली. पट्टेरी मण्यार पोहरा येथील देवेंद्र डोंगरे यांच्या घरी पाच फूट लांबीचा, संदीप तिवाडे यांचे घरी २ फूट लांब, गिरीश मिसार यांच्या घरील गायीच्या गोठ्यातून ३ फूट लांबीचा, त्र्यंबक इळपाते यांचे किराणा दुकानातून २ फूट लांबीचा, यशवंत खेडीकर ग्रामपंचायत सदस्य यांच्या घरातून ४ फूट लांबीचे २ साप, तसेच शेतातील ओसाड विहीरीत असलेल्या ३ पट्टेरी सापांना जीवदान देण्यात सर्पमित्र दर्वेश दिघोरे, तेजस कमाने, उमेश कांबळे, ग्रा.पं.सदस्य यशवंत खेडीकर यांनी परिश्रम घेतले.

याबद्दल अधिक माहिती देताना ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह व लाखनी नगरपंचायतचे ब्रँड अँबेसेडर प्रा.अशोक गायधने यांनी सांगितले की, ‘पट्टेरी मण्यार’ साप हा अत्यंत जहाल प्रकारचा विषारी साप असुन काळे -पिवळे पट्टे असल्याने याला “सतरंज्या साप” किंवा “आग्या मण्यार” साप व पट्टे असल्याने इंग्रजीत ‘बँडेड क्रेट’ साप सुद्धा म्हणतात. याचे शास्त्रीय नाव बंगारस फॅसिएटस असे नाव असून हा महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातील काहीच तालुक्यात सर्वसाधारणपणे आढळत असला तरी इतर भागात आढळत नसल्याने याला दुर्मिळ साप म्हणून विदर्भात तसेच उर्वरित महाराष्ट्रात ओळखले जाते. याचे विष समुद्री सापासारखे अत्यंत जहाल म्हणून ओळ्खले जाते. त्यामुळे हा साप चावल्यास मृत्यू अटळ असतो, शिवाय या सापांवर व समुद्री सापांवर सर्प प्रतिबंधक लस उपलब्ध नसते. इतर चार साप यात नाग, घोणस, फुरसे व साधा मण्यार या सापावर सर्पप्रतिबंधक लस उपलब्ध आहे अशीही माहिती त्यांनी पुरविली. ग्रामीण भागात शेपूट बोथट असल्याने याला दुतोंडया साप असा गैरसमज- अंधश्रद्धा सर्वत्र पसरली आहे. ती चूकीची अंधश्रद्धा आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

या सापाचे प्रमुख खाद्य म्हणजे हा दुसºया लहान सापांना खाऊन जगतो. विशेषत: वेळप्रसंगी स्वजातीचे साप सुद्धा खातो. त्याचसोबत लहान बेडूक, उंदीर, पाल, सरडे सुद्धा वेळप्रसंगी खातो, पाठीच्या कण्याची त्रिकोणी रचना असते. १० दुर्मिळ पट्टेरी मण्यार सापांची पोहरा येथील ग्रीनफ्रेंड्सच्या सर्पमित्र पथकाने सुरक्षित सुटका केल्याबद्दल नेफडो विभागीय वन्यजीव समिती जिल्हा भंडारा विभाग नागपूर, नेफडोचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा लाखनी जिल्हा शाखा भंडारा, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. मनोज आगलावे, अशोका बिल्डकाँनचे पर्यवेक्षक अभियंता नितीश नगरकर, मुंबई इन्स्पेक्टर नेताराम मस्के, कृषी औषधी पुरस्कर्ते इंजि. राजेश गायधनी, गुरुकुल आयटीआय प्राचार्य खुशाल मेश्राम, नगरसेवक संदिप भांडारकर, साकोली सर्पमित्र युवराज बोबडे, गोविंदा धुर्वे, सलाम बेग, रोशन बागडे, रितीक बडोले, सागर चचाने लाखनी, सर्पमित्र चमू पंकज भिवगडे, गगन पाल, मनीष बावनकुळे, खेमराज हुमे, धनंजय कापगते, निलेश रहाटे, नितीन निर्वाण, रुपेश निर्वाण, विवेक बावनकुळे ग्रीनफ्रेंड्सचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक मंगल खांडेकर, अशोक नंदेश्वर, ग्रीनफ्रेंड्स अध्यक्ष अशोक वैद्य यांनी वरील चमुचे अभिनंदन केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *