महिला सरपंचाविरोधात अविश्वास प्रस्ताव पारित

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : सदस्यांना विश्वासात न घेता स्वत:च्या मताने विकासकामे करण्यासह अन्य आरोपांतर्गत कन्हाळगाव / चिचगाव गट ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाविरोधात ७ विरुद्ध २ मतांनी अविश्वास प्रस्ताव पारित झाला. सविस्तर असे की, अडीच वर्षांपूर्वी येथे सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली होती. सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने कांता विलास तलमले यांना सरपंच पदासाठी सदस्यांनी नियुक्त केले होते. मात्र, सदस्यांनी सरपंचांवर स्वमर्जीने कामे करीत असल्याचे आरोप दाखल केले. स्वत: निवडून आलेल्या प्रभागातच विकासकामे केल्याचा आरोप केला. नागरिकांच्या तक्रारींवर दुर्लक्ष करणे, आकसभावनेने निकाल देणे, राजकीय द्वेष भावनेने वागून सरपंच पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, ग्रामपंचायत सदस्यांनी ३१ जुलै रोजी ला तहसीलदार वैभव पवार यांच्याकडे सरपंचाविरोधात महिला अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. तहसीलदारांनी १ आॅगस्ट रोजी नोटीस जारी करून ७ आॅगस्टला अविश्वास प्रस्तावासाठी विशेष सभेचे आयोजन केले होते. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ग्रामपंचायतीच्या सरपंचासह ९ सदस्यांनी हजेरी लावली होती. सदस्यांच्या मागणीनुसार हात उंचावून मतदान घेण्यात आले. ७ सदस्यांनी सरपंचांविरोधात मतदान केल्याने तहसीलदार वैभव पवार यांनी अविश्वास प्रस्ताव पारित झाल्याची घोषणा केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.