आज ही ग्रामीण भागात निनादताहेत भजनाचे “सूर’: युवापिढीचा सहभाग लक्षवेधी

गोंदिया:- सद्या श्रावण मास सुरु असून शुद्ध श्रावण मासाचे दोन सोमवार पार पडले. आता येत्या दिवसात श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सवाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. गणेशोत्सव व जन्माष्टमी म्हटलं की, उत्साह आणि आनंदाचा सण, आबालवृद्धांसह विशेषत: महिला मंडळी या उत्सवाचे स्वागत भजन, पूजन करून करतात. त्यात आजच्या इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या दुनियेत युवापिढी, महिला मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन भजनांमध्ये सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोशल मिडीयाची दुनिया असली तरी ग्रामीण भागात भजन, किर्तनाचा नाद निनादताना दिसून येत आहे. हिंदू धर्मांनुसार श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो. त्यातच श्रीकृष्ण जन्माष्टमीपासून मुर्तीं पुजनाला सुरुवात होते. त्यानंतर गणेश चतुर्थीं व थंडीचा मागोवा देणाऱ्या शरदाची नांदी लावत अश्विन मास अवतरतो. काळानुरूप अनेक धार्मिक सणांचे स्वरूप बदलत चालले असले तरी, लागोपाठ येणारे हे सण उत्सव साजरे करून नागरिक आपली पारंपरिक संस्कृती जोपासत आहे.

या कालावधीतघरोघरी तसेच सार्वजनिकस्थळी आरती, भजनांचे सूर ऐकू येतात. दरम्यान, युवा आणि महिलावर्ग यावर्षीं मात्र, उत्साहाने आपला पारंपरिक संस्कृतीचा साज जपत असल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक मंडळाकडूनही नव्या जोशाने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आल्याचे यावर्षीं पहावयास मिळत आहे. गणेशोत्सव आटोपताच शारदीय नवरात्री व नंतर कार्तिक पौणिमापर्यंतचा कालावधीत सर्वत्र, भजन, पुजन, भागवत आदी धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते. गेल्या पाच ते सहा वर्षांत सर्वांवर इंटरनेटचे गारूड असल्याने सर्वच्या सर्वच सणांना या आधुनिकतेची झालर लागली आहे. इंटरनेटच्या अतिवापरामुळे तरुणपिढी या पारंपरिक भजन आदी कलेपासून दूर जाण्याची भीती व्यक्त होत असताना आता मात्र, सध्या कॉलेज युवकांपासून ते तिशी पर्यंतचे तरुण-तरुणी आरती आणि भजनात रममाण होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.