निधी अडविल्याने रुग्णालयाचे बांधकाम रखडले ?

नाजीम पाशाभाई / भंडारा पत्रिका साकोली :- साकोली उपजिल्हा रुग्णालयाचे प्रस्तावित १०० बेडच्या इमारतीचे बांधकाम वर्ष २०२३ जानेवारीपासून रखडले आहे.कंत्राटदारास पाच कोटी रुपयांच्या बांधकामाचे बिल न मिळाल्यामुळे बांधकाम रखडलेल्या अवस्थेत आहे. करारनामा नुसार काम दोन वर्षात पूर्ण करणे बंधनकारक होते जानेवारी २०२२ पासून कामाला सुरुवात करण्यात आली होती .वीस महिन्याचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा निधीअभावी काम पूर्ण झाले नाही वेळेवर काम पूर्ण झाले असते तर याचा राजकीय श्रेय प्रदेशाध्यक्ष व साकोली क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले यांना मिळाला असता तो मिळू नये म्हणून हेतू पुरस्पर पाच कोटी रुपयांचा निधी वर्तमान सरकारने बांधकामाकरीता प्राप्त होऊ दिला नाही. महाविकास आघाडी शासनाच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या विकास कामांना आर्थिकदृष्ट्या ब्रेक लावून जनमानसात संभ्रम निर्माण करण्यासाठी सत्ताधारयांकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. भविष्यात लवकरच होणाºया लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता वर्तमान सत्तापक्षाकडुन विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलल्या जात आहे.

अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते तेच वर्तमान पालकमंत्री आहे अर्थमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आहेत या दोन्ही अर्थमंत्र्यांनी प्रस्तावित १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाला लागणारा निधी थांबवून ठेवल्याचे बोलले जात आहे. या कामाची अंदाजपत्रकीय किंमत ४५ कोटी होती निविदे नुसार कमी किंमतीत ३६ कोटी रुपयात करारनामा करण्यात आला आहे. सदर बांधकाम सुरू झाल्यानंतर तीन कोटी रुपयाचा प्रथम टप्प्याच्या निधी देण्यात आला आहे. सहा कोटी रुपयांच्या द्वितीय टप्प्याच्या निधीची मागणी केली असता शासनाने दीड कोटी रुपयाची तुटपुंजी निधी आगस्ट महीण्यात मंजूर केल्याची माहिती आहे. कंत्राटदारदाराचे जवळपास पाच कोटी रुपये थकीत असल्याने बांधकाम कार्य रखडलेल्या अवस्थेत आहे.

हे उपजिल्हा रुग्णालय राष्ट्रीय महामार्गावर असून लाखांदूर, मोरगाव अर्जुनी ,सडक अर्जुनी व देवरी तालुक्या करीता मध्यवर्ती ठिकाण आहे. याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना रुग्ण सेवेकरिता व्हावा याकरिता उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे प्रस्तावित शंभर बेडच्या इमारतीचे बांधकाम सुरू होते हे बांधकाम २० महिन्याचा कालावधी होऊनही पूर्ण झाले नाही करारनाम्यानुसार चार महिने शिल्लक राहिले आहेत. वर्तमान सरकारने निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे चार महिन्यात बांधकाम पूर्ण होईल याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाकडून मागणीनुसार वेळेवर निधीची उपलब्धता न झाल्यामुळे मजूर वर्गाने पलायन केले असल्याचे चित्र आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाला लवकर निधी प्राप्त व्हावा व रखडलेले बांधकाम त्वरित युद्ध स्तरावर सुरू व्हावे अशी सर्व सामान्य नागरिकांची मागणी आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.