प्रसुतीपश्चात महिलेचा मृत्यू; नातेवाईकांचा संताप

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : प्रसुतीपश्चात बाळंतीण मृत्यू प्रकरणी सोमवारी जिल्हा सामान्य रूग्णालयात नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले. डॉक्टरांच्या निष्कळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मध्यरात्रीपर्यंत आंदोलन सुरू होते. अखेर पोलीस प्रशासन व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम यांच्या मध्यस्थीमुळे नातेवाईकांनी मृतदेह रूग्णालयातून हलविले. प्रकरणी उच्चस्तरीय नि:ष्पक्ष चौकशी समिती गठीत करण्याचे आश्वासन देण्यात आले. मृतक तरूणीचे नाव प्रतीक्षा अनिकेत उके (२२) रा. टाकळी (खमारी), असे आहे. प्रतीक्षा उके हिला २९ नोव्हेंबर रोजी नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात बाळंतपणासाठी भरती केले होते. ३० नोव्हेंबरला सीझर बाळंतपण करण्यात आले. प्रतीक्षाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. सध्या बाळ रूग्णालयात उपचारार्थ आहे.

प्रसुतीपश्चात उपचार सुरू असतांना ३ डिसेंबर रोजी तीची अचानकप्रकृती बिघडली. प्रकृती आणखी नाजूक दिसून येताच डॉक्टरांचे सल्ल्याने तीला नागपूर येथील मेडीकल कॉलेजला हलविण्यात आले. ४ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास नागपूर येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. नागपूर येथे शवविच्छेदन करण्यात आले. प्रसुतीपश्चात तरूणीचा मृत्यू झाल्याने आक्रोशीत नातेवाईकांनी सोमवार ४ डिसेंबर रोजी रात्री ९ च्या दरम्यान मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात आणला. दोषी डॉक्टरांवर तातडीने फौजदारी कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. जमावाचा आक्रोश सुरू असतांनापोलिसांची चमू घटनास्थळी दाखल झाली. ३० ते ४० नातेवाईकांचा जमाव मागण्या पूर्ण होईपर्यंत मृतदेह गावाकडे न्यायला तयार नव्हते. अखेर पोलीस प्रशासन व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम यांच्या मध्यस्थीने तातडीने उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करण्याचे आश्वासन देण्यात आले. शवविच्छेदन व चौकशी समितीच्या अहवालातील दोष सिद्धतेनंतर तातडीने दोषींवर कारवाई करण्याचे स्पष्ट केल्याने नातेवाईकांचे समाधान झाले. मध्यरात्री १ च्या दरम्यान मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयातून हलविण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *