रोहणा येथे सुरू असलेले नालीचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील रोहणा येथे सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत सुरू असलेले नालीचे (झाकणासहित) बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याची तक्रार सुनिल मेश्राम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडी यांच्याकडे एका तक्रारी द्वारे केली आहे . मोहाडी तालुक्यातील रोहणा येथे सार्वजनिक बांधकाम विभागा कडून रोहणा ते रोहा रस्त्याने दोन्ही बाजूने ३०० मीटर नाली (झाकणासहित), ३०० मीटर डांबर रस्ता, १ सिडी वर्क असे १ करोड रुपये अंदाजपत्रकाचे काम मंजूर झाले असून हे काम खुल्या निविदे मध्ये पडोळे ( तुमसर) नामक कंत्राटदाराला मिळाले आहे, त्यांनी हे काम स्वत: न करता आपली व ईतर अधिकारी कर्मचारी यांची ‘कमिशन’ ठेवून एका बांधकामाचा अनुभव नसलेल्या ठेकेदाराला पेटी मध्ये दिले आहे. सध्या नालीचे बांधकाम सुरू असून कंत्राटदार आपल्या कमाईसाठी अल्प प्रमाणात लोहा, कमी किमतीचा सिमेंट, गावातून वाळू माफिया कडून घेतलेली माती मिश्रित काळी चोरीची वाळू, धूळचुरी मिश्रित गिट्टी वापरून निकृष्ट दर्जाची नाली तयार करण्यात येत आहे. पाणी वाहून जाता यावा, असा नालीला उतारही देण्यात आला नाही. रस्त्यापासून अंदाजपत्रकाप्रमाणे जागा न सोडता रस्त्यालगतच नालीचे बांधकाम करण्यात येत आहे.

अंदाजपत्रकाप्रमाणे काम न करता आपल्या मनमर्जिने निकृष्ठ दर्जाचे काम ठेकेदाराकडून केल्या जात आहे. बांधकामावर भरपूर पाणी मारल्या जात नाही. कामाच्या ठिकाणी काम सुरू असल्याचा फलक लावलेला नाही . सिमेंट नाली बांधकामाच्या कामावर अडाणी, अशिक्षित ज्यांचा विमा काढलेला नाही. अशा मजुरांची निवड करून त्यांच्या हाताने ओबड – धोबड काम केल्या जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही कर्मचारी सदर कामावर उपस्थित राहत नसल्याने ठेकेदाराला बांधकामात भ्रष्टाचार करण्यास रान मोकळे झाले आहे. आपले निकृष्ट दजार्चे काम गावात माहीत होऊ नये म्हणून या ठेकेदाराने साधे बांधकामाचे भूमिपूजनही केले नाही. शासन सर्वात जास्त पैसा नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्या म्हणून रस्ते, नाली बांधकामावर खर्च करते, मात्र ज्याच्याकडे हा पैसा खर्च करण्याची जबाबदारी आहे ती यंत्रणाच बोगस कामे करून अर्धाअधिक पैसा आपल्याच घशात घालते. त्यामुळेच प्रत्येक गावातील, शहरातील कामे निकृष्ट दजार्ची होत आहेत. रोहणा येथील नाली बांधकामाची चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करावी व सदर कामाचे देयके थांबविण्यात यावे, अशी मागणी सुनिल मेश्राम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडी यांच्याकडे तक्रारी द्वारे केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *