ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाला लागली उतरती कळा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाचे घोडे गत अनेक वर्षांपासून अडले आहे. लोकसभा निवडणुक तोंडावर असतांना जिल्ह्यातील अनेक पर्यटन विकासाच्या चर्चा होत आहेत. मात्र चांदपूर पर्यटनस्थळ विकासाच्या मुद्दयावर एकही राजकिय पुढारी पुढे आले नाही, ही एक शोकांतिकाच आहे. निवडणुक प्रचाराच्या रणधुमाळीत हा विषय गाजणार का? ही चर्चा चांगलीच जोर धरुन आहे. चांदपूर पर्यटनस्थळ हा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीत आहे. परंतु मागील काही वर्षांपूर्वी विकसित करण्यात आलेल्या चांदपूर पर्यटनस्थळाला आता उतरती कळा लागली आहे. शासकीय विभागाची यंत्रणा असहकार्याची भूमिका बजावत असल्याने कंत्राटदाराने सुद्धा लीज संपण्याच्या आधीच पर्यटनस्थळातून आपला काढता पाय घेतला आहे. सर्व साहित्य गुंडाळून पर्यटनस्थळाला पाठ दाखवली आहे. शेकडो बेरोजगार तरुणांना रोजगार देणारा पर्यटनस्थळ बंद होताच अनेक तरुण पुन्हा बेरोजगार झाले आहेत. रोजगार हिरावल्यानंतर अनेक तरुणांनी गावातून शहराकडे पलायन केले आहे. भंडारा जिल्ह्यात ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ हे नंदनवन म्हणून प्रचलित झाले आहे. पर्यटन व निसर्गरम्यस्थळ म्हणून चांदपूर गावाला निसर्गाच्या सानिंध्यात वैभवप्राप्त झाले आहे. परंतु शासनाच्या उदासीनपनाचा फटका पर्यटनस्थळाला बसला आहे.

पर्यटनस्थळाच्या विकास कार्यात वन विभाग व जलाशयाच्या शेजारी असणाºया जागेची समस्या होती. परंतु या दोन्ही समस्या निकाली काढण्यात आलेल्या आहेत. भंडारा बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर असणाºया या पर्यटनस्थळाच्या विकासाच्या बाबतीत असलेली उदासीनता अधोगतिला कारणीभूत ठरली आहे. पर्यटनस्थळात जागृत हनुमान देवस्थान भक्तांचे श्रद्धास्थान आहे. येथे अनेक आमदार, खासदार व मंत्र्यांनी भेटी दिल्या आहेत. परंतु त्यांनी ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाच्या विकासाकडे दुर्लक्षच केले. ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ विश्रामगृह बांधकाम करण्यासाठी ६ कोटीहून अधिक निधी खर्च करण्यात आली आहे. अत्याधुनिक विश्रामगृहात अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. विश्रामगृहाचे हस्तांतरण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला करण्यात आले आहे. परंतु या विश्रामगृहाचे उद्घाटन अजुनही करण्यात आले नाही. नागपुरचे दोन दोन हिवाळी अधिवेशन संपले परंतु अधिवेशन काळात मंत्री फिरकले नाहीत. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न अशी अवस्था या विश्रामगृहाची झाली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.