२० वर्षांपासून फरार दोन गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार येथे जबर दुखापत करुन दरोडा घालून फरार असलेल्या दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. २ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथील मुकूंदवाडी येथून दोन्ही गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. सूर्यभान व्यंकटी काळे (६५) व गणेश ऊर्फ गणपती उर्फ गणपत व्यंकटी काळे (५०) दोन्ही रा. केकतपांगरी, जिल्हा बीड असे गुन्हेगारांचे नाव आहेत. डुग्गीपार येथे २००४ मध्ये आरोपी काळे बंधुंनी एका कुटूंबीयांना जबर मारहाण करुन दरोडा टाकला होता.

याप्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी भादंवि ३९५, ३९७ गुन्हा दाखल केला. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे जिल्ह्यात विविध गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश संबंधित पोलिस ठाण्यांना दिले. त्यानुसार पोलिस निरीक्षक दिनेश लबाडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा पथकाद्वारे फरार आरोपींना अटक करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत होती. यातंर्गत डुग्गीपार येथील घटनेत २० वर्षांपासून फरार असलेले आरोपी छत्रपती संभाजीनगर येथील मुकूंदवाडी परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे व वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलिस पथकाने संभाजीनगर गुन्हे शाखा पोलिसांच्या मदतीने सूर्यभान काळे व गणेश काळे यांना मुकूंदवाडी येथील गेट नं. ५६ राजनगर येथील घरातून ताब्यात घेतले. पुढील कारवाईकरीता आरोपींना डुग्गीपार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलिस अंमलदार विठ्ठल ठाकरे, रियाज शेख, इंद्रजित बिसेन, पोलिस शिपाई संतोष केदार, चालक पोलिस हवालदार लक्ष्मण बंजार यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *