“नशेत झाला वाद ; मित्रांच्याच हातून निखिल कांबळेचा खून”

 

साकोलीतील हत्याकांडाचा पोलीसांनी केला १२ तासांत उलगडा” ४ आरोपींसह विधीसंघर्षग्रस्त बालकाला अटक
आरोपींना २७ मेपर्यंत पोलीस कोठडी

(नाजीम पाशाभाई)
साकोली :शहरातील गडकुंभली रोड परिसरातील तलाव काठावर शुक्रवारी (दि.२२ मे) पहाटे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला युवकाचा मृतदेह आढळल्यानंतर संपूर्ण साकोली हादरली होती. छाती, मान आणि डोक्यावर धारदार शस्त्राचे खोल वार, शेजारी उभी मोटरसायकल, बाजूला पडलेली बॅग आणि शहराच्या मध्यभागी घडलेली ही थरारक हत्या… या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी अवघ्या १२ तासांत तपासाची चक्रे वेगाने फिरवत या हत्येचा उलगडा केला आणि ज्यांच्यासोबत मृतकाने शेवटची रात्र घालवली तेच त्याचे “जिवलग मित्र” मारेकरी असल्याचे समोर आले. नशेच्या अवस्थेत झालेली अश्लील शिवीगाळ, जुनी खुन्नस आणि क्षणिक संतापातून मित्रांनीच निखिल राजकुमार कांबळे (वय ३०, रा. मुरपार-लेंडेझरी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया) याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक कबुली आरोपींनी पोलिसांसमोर दिली आहे.

मैत्री, नशा आणि मृत्यूची रात्र…
प्राप्त माहितीनुसार, निखिल कांबळे हा २१ मे रोजी आपल्या मित्र गणेश मनोहर वलथरे (वय २०, रा. शिवाजी वार्ड, साकोली) याच्यासोबत मोटरसायकल क्रमांक एमएच ४० के ५०९९ ने आपल्या मूळ गावी मुरपार येथे गेला होता. रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास दोघांनी कुटुंबीयांसोबत जेवण केले आणि पुन्हा साकोलीकडे परत निघाले.
साकोलीत निखिल राहत असलेल्या भाड्याच्या खोलीवर आल्यानंतर त्याने इतर मित्रांना फोन करून बोलावले. काही वेळातच मित्रांचा ग्रुप एका अज्ञात ठिकाणी एकत्र आला. नशेत सुरू झालेली मैफल हळूहळू वादात बदलली. नशेच्या भरात निखिल आणि त्याच्या मित्रांमध्ये शाब्दिक चकमक झाली. अश्लील शिवीगाळ झाल्याने वातावरण चिघळले. आधीपासून मनात असलेली खुन्नस आणि नशेचा अंमल यामुळे मित्रांनी संतापाचा स्फोट केला. वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी धारदार शस्त्राने निखिलवर सपासप वार केले. छाती, मान आणि डोक्यावर भीषण प्रहार करण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या निखिलचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

खून करून मृतदेह तलाव काठावर फेकला
हत्या केल्यानंतर आरोपी घाबरले. गुन्हा लपविण्यासाठी त्यांनी निखिलचा मृतदेह शहरातील गडकुंभली रोडवरील तलावाच्या काठावर आणून फेकून दिला. मोटरसायकल आणि बॅग घटनास्थळीच टाकण्यात आली. त्यानंतर आरोपी वेगवेगळ्या दिशेने पसार झाले.
२२ मे रोजी पहाटे क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या युवकांना तलावाजवळ रक्तबंबाळ मृतदेह दिसताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस दाखल होताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

“सुगावा नव्हता… पण पोलिसांनी उलगडली हत्या”
मृतदेहाजवळ कोणताही स्पष्ट पुरावा नव्हता. तरीही साकोली पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे वेगाने हलवली. मृतकाचे मोबाईल कॉल डिटेल्स, शेवटचे लोकेशन, मित्रांची हालचाल, घटनास्थळी सापडलेल्या वस्तू आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयाची सुई गणेश वलथरेकडे वळवली.
दरम्यान, गणेश नागपूरमधील वाडी परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने नागपूर गाठले आणि अत्यंत शिताफीने गणेश वलथरेला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत कमलेश चुन्नीलाल कुकवास (वय २३, रा. मानेगाव, ता. लाखनी) यालाही अटक करण्यात आली.
दुसरीकडे साकोली पोलिसांनी सागर शंकर पारधी (वय १९, रा. शिवाजी वार्ड, साकोली), ओमकार सुनिल मेश्राम (वय २१, रा. शिवाजी वार्ड, साकोली) आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला शहरातूनच ताब्यात घेतले.

आरोपींची धक्कादायक कबुली
पोलिसी चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. “निखिलने नशेत शिवीगाळ केली… ती सहन झाली नाही… रागाच्या भरात मारहाण केली आणि खून झाला,” अशी कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
मित्रांच्या वर्तुळात सुरू झालेली नशेची पार्टी काही क्षणांत रक्तरंजित हत्याकांडात बदलली. क्षणिक राग, नशेचा अतिरेक आणि मनातील सूडभावना यामुळे एका तरुणाचा जीव गेला आणि पाच जणांचे आयुष्य गुन्हेगारीच्या अंधारात ढकलले गेले.

अवघ्या १२ तासांत पोलिसांची मोठी कामगिरी
या प्रकरणी साकोली पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्र. ४५१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चिंचोळकर, साकोलीचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन तायवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू साळवे, प्रशांत वडुळे तसेच पोलीस कर्मचारी नरेंद्र झलके, स्वप्निल गोस्वामी, राहुल गायधनी आणि गोविंद शिंदे यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली.
विशेष म्हणजे, कोणताही ठोस सुगावा नसताना पोलिसांनी केवळ १२ तासांत सर्व आरोपींना अटक करून खुनाचा उलगडा केला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून विधीसंघर्षग्रस्त बालकाला बालसुधारगृहात पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाईसमोर मोठा प्रश्न
साकोलीतील ही घटना केवळ एक खून नसून नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाईचे भीषण वास्तव समोर आणणारी आहे. कालपर्यंत एकत्र फिरणारे, जेवण करणारे आणि मैत्रीचे दावे करणारे मित्र काही क्षणांच्या संतापात एकमेकांचे जीव घेण्याइतके हिंसक बनत आहेत, ही समाजासाठी गंभीर इशारा देणारी बाब मानली जात आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *